देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
कै. ल.रा.बिहाणी विद्यामंदिर प्रशालेच्या शालेय सहलीच्या बस मार्गस्थ झाल्यावर अवघ्या अर्ध्या तासात अपघात झाला. या अपघातात दोन मुली जखमी झाल्या आहेत. त्यापैकी आरुषी गोरे हिला संगमनेर येथे तर आदिती आघाव हिला राहुरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसला झालेल्या अपघाताची जबाबदारी कोण स्वीकारणार असा सवाल करुन विद्यार्थ्यांचे पालक या नात्याने शाळा प्रशासनास जाब विचरणार असल्याचे राहुल इंगळे यांनी पञकारांशी बोलताना सांगितले.
राहुरी येथुन बस सहलीसाठी मार्गस्थ झाल्यावर अवघ्या अर्धातासात पंधरा किलोमीटर अंतरावरील चिंचोली फाटा गावाजवळ एका पिकअप व्हँनला वाचविण्यासाठीच्या प्रयत्नातून बस रस्त्याच्या कडेला खोदलेल्या साईडपट्टीवर पलटी झाली.या अपघातात आरुषी गोरे व आदिती आघाव या दोघी जखमी झाल्या आहेत. त्यांना अनुक्रमे संगमनेर व राहुरी येथे उपचारासाठी दाखल केले आहे.या अपघात जीवित हानी झाली नाही.इतर विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागला असुन प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले.अपघाता नंतर विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी धास्ती घेतल्याने शाळेच्या सर्व इयत्तांच्या सहली रद्द करण्यात आल्या.
विद्यामंदिर प्रशालेची स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात येथे एक दिवसाच्या मुक्कामी सहलीसाठी दोन बस राहुरी इथून दुपारी तीनच्या सुमारास निघाल्या होत्या. दोन बस मध्ये 55 व 40 असे एकूण 95 विद्यार्थी व आठ शिक्षकांचा समावेश होता.महालक्ष्मी ट्रँव्हल्स या खाजगी कंपनीच्या बसेस तिनही सहलीसाठी होत्या.दोन सहली रात्री निघणार होत्या.नववी व दहावीची सहल गुजरातला दुपारी तीन वाजता मार्गस्थ झाली. चिंचोली येथे पहिली बस आली असता पाठीमागून येणाऱ्या पिक अप व्हँनने पाठीमागून ओव्हरटेक करीत हुलकावणी दिली. त्या पिक अप व्हँनला वाचवण्यासाठी बसचालकाने बस डाव्या बाजूला घेत अचानक ब्रेक दाबला व बस साईडपट्टीवर गेल्याने तीन ते चार फुट साईडपट्टी एका बाजूला पलटी झाली.बस अपघात ग्रस्त झाल्या बरोबर विद्यार्थी एकदम घाबरून गेले. त्यांनी आरडाओरडा मोठ्याने रडारड सुरू केली .मदतीसाठी त्यांनी हाका मारायला सुरुवात केली.विद्यार्थी मोठ्या प्रमाणात घाबरलेले होते.चिंचोली फाटा येथिल सरपंच गणेश हारदे,रणजित आरगडे,दौलत वर्पे,अशोक टकले,दत्तू वर्पे यांच्यासह ग्रामस्थ,युवावर्ग मोठ्या प्रमाणात मदतीसाठी धावून आले.रविंद्र देवगिरे यांनी रुग्णवाहीनीतुन विद्यार्थ्यांना उपचारासाठी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले.
मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सर्जेराव पेरणे व मुख्याध्यापक आबासाहेब गडदे, बाळासाहेब निवडूंगे, दादासाहेब कुलट ,बाळासाहेब डोंगरे हे मुख्याध्यापक संघाची बैठक आटोपून राहुरीकडे येत असताना अपघाताची समजताच ते अपघातस्थळी पोहचले.
सोशल मीडियावर या अपघाताचे फोटो व्हायरल झाले. बसच्या फुटलेले खिडकींच्या काचा बघून पालक ही घाबरून गेले. पालकांनी प्रथम शाळेत व नंतर अपघात स्थळी धाव घेतली.महिला पालक आपल्या पाल्यासाठी अक्रोश करु लागल्या.आपला पाल्य सुखरुप दिसल्यानंतर त्या महिला पालकांचा जीव भांड्यात पडला.विद्यामंदिर प्रशालेतील शिक्षक ही मदतीसाठी चिंचोलीत आले. शाळेने आज तीन ठिकाणी सहलीचे आयोजन केलेले होते. या अपघातामुळे शाळेच्या या सर्व सहली रद्द करण्यात आल्या .पर्यायी बसची व्यवस्था करण्यात आली व सहलीसाठी निघालेल्या सर्वांना परत राहुरीत आणण्यात आले. पाल्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
राहुल इंगळे या पालकाने सुरवातीला बस चालक याला अपघातास जबाबदार धरले.आमचे पाल्य शाळेच्या शिक्षकांच्या भरवाश्यावर सहलीसाठी पाठविण्यात आले होते.सर्व पालक एकञ येवून या अपघाताची जबाबदारी नेमकी कोणाची याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी शाळेच्या प्रशासनाला जाब विचारण्यात येईल असे इंगळे यांनी सांगितले.
…. त्यांनी मदत करण्या ऐवजी व्हीडीओ काढण्यात दंग!
राहुरी येथिल विद्या मंदिर प्रशाळेतीची सहल गुजरात येथे जात असताना चिंचोलीफाटा येथे बस पलटी झाली. बस मधील विद्यार्थी मदतीसाठी याचना करीत असताना मदत करण्या ऐवजी ते सोशल मिडीयावर फोटो व व्हिडीओ टाकण्यासाठी मोबाईल मध्ये फोटो व शुटींग घेत होते. चिःचोलीचे सरपंच सरपंच गणेश हारदे,रणजित आरगडे,दौलत वर्पे,अशोक टकले,दत्तू वर्पे यांनी धावत येवुन मदत केली.सरपंच गणेश हारदे यांनी फोटो व शुटींग घेणाऱ्या वाटसरुंना चांगलेच फैलावर घेत तुमच्यातील माणुसकी मोबाईलमुळे संपली का? असा प्रश्न केला.