कोळपेवाडी वार्ताहर :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. दोन्ही परीक्षांचा निकाल १०० टक्के लागला असून कोळपेवाडी केंद्रातून दोनही परीक्षांमध्ये गौतम पब्लिक स्कूल अव्वल ठरले असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.
संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्यातील कलात्मक गुण विविध स्पर्धा आणि परीक्षांद्वारे चमकवण्याचा प्रयत्न गौतम पब्लिक स्कूलमध्ये सातत्याने केला जात आहे. त्यामुळे गौतम पब्लिक स्कूल शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा क्षेत्रातही आपला दबदबा कायम ठेवून असल्याचे प्राचार्य नूर शेख यांनी सांगितले आहे.
शासकीय इंटरमिजिएट परीक्षेमध्ये एकूण ९६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पंधरा विद्यार्थ्यांनी “अ” श्रेणी व ४४ विद्यार्थ्यांनी ” ब” श्रेणी प्राप्त केली आहे. तसेच एलिमेंट्री परीक्षेमध्ये शाळेचे एकूण ११७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यामध्ये ०९ विद्यार्थ्यांनी “अ” श्रेणी व ७९ विद्यार्थ्यांनी “ब ” श्रेणी प्राप्त केली आहे. सन २००६ पासून गौतम पब्लिक स्कूलच्या १००% निकालाची परंपरा कायम राहिली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांचे संस्थेचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळे, विश्वस्त आ. आशुतोष काळे, सचिव सौ.चैताली ताई काळे, व्हा. चेअरमन छबुराव आव्हाड, सर्व गव्हर्निग कौन्सिल सदस्य, प्राचार्य नूर शेख व सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.