संगमनेर : लोकशाहीर संभाजी भगत यांच्या शाहिरी जलसा कार्यक्रमाचे संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे ३ मे रोजी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती येथील संयुक्त जयंती महोत्सव समितीने दिली आहे .
याबाबत समितीने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, देशात प्रचंड महागाई, बेरोजगारी वाढली असून शिक्षणाचे बाजारीकरण सुरू आहे. त्यात शेतकऱ्यांच्या समस्या अत्यंत गंभीर होत चालल्या असून सर्वच वर्ग समुहतील लोकांच्या समस्या उग्र रूप धारण करत आहेत. त्यामुळे मिळालेल्या संविधानिक हक्क अधिकारांची पायमल्ली होत असल्याने समाज प्रबोधन करणे व आपल्या हक्क अधिकारांचे जतन करण्यासाठी लढा देणे ही बुध्दीजीवी वर्गातील लोकांची सामाजिक आणि नैतिक जबाबदारी बनली आहे.त्यामुळे आश्वी खुर्द येथील संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून मागील एका दशकापूर्वी व्यापक प्रबोधन चळवळ हाती घेतली असून समितीने मागील काही वर्षांपासून मोफत अभ्यासिका, कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर्सला अत्यावश्यक किट पुरवठा करणे यासारखे उपक्रम राबविले आहेत. तसेच १४ एप्रिल २०२२ पासुन १० मे २०२२ पर्यंत संविधान जागृती साठी सम्यक धम्म रथ यात्रा आयोजित करुन सुमारे ३२ प्रबोधन सभा आयोजित करून यशस्वी करण्यात आलेल्या आहेत.समाज प्रबोधनाचा सुयोग्य परिणाम साधला जावा यासाठी संयुक्त जयंती महोत्सव समितीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “माझ्या दहा सभा जो परिणाम करू शकत नाही; तो परिणाम शाहिरांचं एक गीत करू शकते” ! या विचाराला आधार बनवून सर्व स्तरातील समाज बांधवांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रसिध्द लोकशाहीर संभाजी भगत यांच्या विद्रोही शाहिरी जलसा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.दरम्यान आश्वीसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शाहिरी जलसा कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.