कोपरगाव :- शिर्डी-कोपरगाव महामार्गावर सुरक्षा उपाय लवकरात करावे अशी मागणी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम,आत्मा मलिक संकुलाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे. याबाबती २८ डिसेंबरपर्यंत योग्य ती कार्यवाही न झाल्यास ट्रस्टचे सदस्य, भक्तगण आणि अनुयायी शांतपणे आंदोलन करतील. तसेच यापुढे अपघात झाल्यास संबंधित प्राधिकरणांवर हत्येचा प्रयत्न किंवा सदोष मानुष वधाचे तक्रार दाखल (FIR) करण्यात येईल आणि अपघाताचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे .
विश्वात्मक जंगली महाराज आश्रम,आत्मा मलिक संकुलाच्या वतीने याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिर्डी-कोपरगाव महामार्गावरील रस्त्याचे प्रलंबित काम आणि त्यावरील सुरक्षेच्या अभावामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाण ट्रस्टने वारंवार संबंधित प्राधिकरणांकडे पत्रव्यवहार आणि तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. या महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या चिंताजनक आहे. आत्मा मालिक रुग्णालयाने 115 हून अधिक अपघातांची नोंद केली आहे. या अपघातांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून काही जण कायमस्वरूपी अपंग झाले आहेत.
महामार्गावरील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम, आत्मामालिक रुग्णालय आणि शैक्षणिक संकुलामुळे हजारो नागरिक, विद्यार्थी आणि प्रवासी दररोज रस्त्याचा वापर करतात. मात्र, रस्त्यावर आवश्यक स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग, उड्डाणपूल किंवा सर्व्हिस रोड उपलब्ध नाहीत
नुकत्याच झालेल्या एका अपघातात हेमराज पाटील गंभीर जखमी झाले, तर एका बस व टँकरची धडक होऊन मोठा अपघात घडला.यामध्ये अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले . आत्मामालिक ट्रस्टने संबंधित प्राधिकरणाकडे २८ डिसेंबर २०२४ पूर्वी स्पीड ब्रेकर आणि झेब्रा क्रॉसिंग लवकरात लवकर बसवणे. उड्डाणपूल व सर्व्हिस रोड यांसारख्या सुरक्षात्मक उपायांची अंमलबजावणी त्वरित करण्याची मागणी केली आहे: