शिर्डी येथे सौर एजन्सी, वित्तीय संस्था व ग्राहकांशी थेट संवाद
शिर्डी, दि. ४ :- शिर्डीला सौर शहर करण्यासाठी समाजातील सर्व घटकांच्या सहकार्याची गरज असून येत्या डिसेंबरपर्यंत शंभर टक्के सौर शहर करण्याचा महावितरणचा संकल्प आहे, असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी केले. महावितरणच्या शिर्डी उपविभागाच्यावतीने शिर्डीतील शांती कमल भक्तनिवास येथे आयोजित ग्राहक संवाद मेळाव्यात ग्राहक, वित्तीय संस्था, सौरप्रणाली विक्रेते आणि महावितरणचे अभियंते यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते.
याप्रसंगी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औढेंकर, कोकण प्रादेशिक विभागाचे प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक सुनिल काकडे, नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता रमेश पवार, शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतिश दिघे, अखिल भारतीय नवीकरणीय उर्जा असोसिएशनचे अध्यक्ष साकेत सुरी, कार्यकारी अभियंता अनिल थोरात व जनसंपर्क अधिकारी विकास आढे आदी उपस्थित होते.
रेशमे म्हणाले, शिर्डीला पर्यावरणपूरक सौर शहर करण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून ५० मेगावॅट क्षमतेचा सौर वीजेचा पुरवठा करण्यात येणार आहे. शिर्डी शहरातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा, सरकारी कार्यालये या वर्गवारीतील वीज ग्राहकांना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून तीन किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी प्रत्येक कुटुंबाला केंद्र शासनाकडून ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी देण्यात येणार आहे. या योजनेचा शिर्डी शहरातील सर्व वीज ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
खासदार वाकचौरे म्हणाले, शिर्डी हे सौर उर्जा निर्मितीसाठी अनुकूल शहर आहे. या योजनेच्या यशस्वीतेसाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. सौर उर्जा ही काळाची गरज असून प्रत्येक घरगुती वीज ग्राहकांनी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घ्यावा.
कोळेकर म्हणाले, शिर्डी शहराला आंतरराष्ट्रीय ओळख असून शिर्डीतील सर्व शासकीय कार्यालये सौर उर्जेवर आणण्याकरीता प्रयत्नशील असल्याचे सांगितले. सर्व प्रशासकीय यंत्रणा यांनी एकत्र येऊन ही योजना राबविल्यास शिर्डी शहर सौर होण्यास अडचण येणार नाही.
औंढेकर म्हणाले, सौर उर्जेचा वापर वाढल्यास भविष्यात वीज जोडणीसाठी कुणालाही महावितरणच्या कार्यालयात येण्याची गरजच राहणार नाही. त्यादृष्टीने सुविधा उपलब्ध करून देण्यावर महावितरणचा भर राहणार आहे महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये शिर्डी सौर शहर नियोजन आराखड्याची माहिती दिली. शिर्डी सौर शहर करण्यासाठी सर्वच घटकांचे सहकार्य लाभत असून लवकरच सौर शहर म्हणून शिर्डी नावारूपाला येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतिष दिघे, सौर ग्राहक विनोद गोंदकर, रमेश गोंदकर, भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक सचिन खेडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला महावितरणच्या संगमनेर व शिर्डी उपविभागातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी ग्राहकांना माहिती देण्यासाठी सौर एजन्सी आणि वित्तीय संस्थांनी स्टॉल्स उभारले होते.