एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात प्रलंबित आहे. यासंदर्भात दोन्ही पक्षकारांनी आपलं म्हणणं सोमवारी (23 जानेवारी) लेखी स्वरुपात मांडावं, अशी निवडणूक आयोगाने केली. त्यानंतर याबाबतची पुढील सुनावणी 30 जानेवारीला होईल, असं आयोगाने स्पष्ट केलं.
दरम्यान, निवडणूक चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असल्याने आता उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर टांगती तलवार आली आहे.
उद्धव ठाकरेंच्या पक्ष प्रमुखपदाची मुदत 23 जानेवारी 2023 रोजी संपणार आहे, मात्र आयोगातील सुनावणी लांबल्याने त्यांच्या पदाचं आता काय होईल, हा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.
आज नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनना कुणाची आणि तात्पर्याने धनुष्यबाण चिन्ह कुणाचं हा वाद निवडणूक आयोगात गेलेला आहे. या प्रकरणाची सुनावणी आज (20 जानेवारी) दिल्ली येथे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात झाली.
यामध्ये उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आता संपला असून त्यांना लेखी म्हणणं मांडण्याची सूचना आयोगाने केली. दोन्ही गटांनी लेखी उत्तर दिल्यानंतर पुढील सुनावणी 30 जानेवारी रोजी होईल, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. त्यामुळे आता पुढील सुनावणीत निवडणूक आयोग निकाल देतं की सुनावणी आणखी लांबते, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
उद्धव ठाकरे गटाने काय म्हटलं?
आजची सुनावणी झाली, त्यांच्या याचिकेतील मुद्दे आम्ही खोडून काढले आहेत. पक्ष म्हणजे केवळ आमदार, खासदार नसून पक्ष कार्यकारिणी असते. त्याबाबतचा खुलासा आमच्या वकिलांनी केला. म्ही त्यांच्या याचिकेतील त्रुटी निवडणूक आयोगाला दर्शवून दिल्या आहेत.
प्रतिनिधी आजही उद्धव ठाकरेंसोबत असल्यामुळे पक्ष फुटलेला नाही. तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच आहे, त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांनाच मिळेल, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यनेतेपदावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे.
अनिल परब म्हणाले, “आमच्या घटनेत मुख्यनेते पद नाही. त्यांनी दाखवलेलं पद बोगस आहे. त्यांनी कागदपत्रात मुंबई बाहेरचे विभाग प्रमुख दाखवलेत. शिवसेनेच्या घटनेत विभाग प्रमुख फक्त मुंबईत असतात. त्यांती प्रतिनिधी सभा बोगस आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे.”
आम्ही 3 लाख प्रतिज्ञापत्रं जमा केली आहेत. त्यांनी शून्य प्रतिज्ञापत्रे जमा केली आहेत.
प्रतिनिधी सभेत त्यांनी घेतलेले सभासद शिवसेनेच्या घटनेचा भागच नाहीत. ते सभासद कोण असावेत, याचा घटनेत उल्लेख आहे. मात्र, त्यांनी घटनेची मोडतोड करून सभा घेतली, हे आम्ही आयोगाला दर्शवून दिलं, असंही अनिल परब यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे गटाचा युक्तिवाद
एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी निवडणूक आयोगात त्यांच्याकडून करण्यात आलेल्या युक्तिवादाबाबत माहिती दिली.
ते म्हणाले, “आजच्या सुनावणीत तीन मुद्द्यावर महत्त्वाची चर्चा झाली. बाळासाहेबांनी बनवलेली घटना, उद्धव ठाकरेंनी बनवलेली घटना आणि आता नव्याने बनवण्यात आलेली राज्यघटना त्यांच्याबाबत जास्त युक्तिवाद झालं.
पक्षाचं अस्तित्व हे लोकप्रतिनिधींवरच अवलंबून असतं. कारण त्यांनी मिळवलेल्या मतांवरच त्यांची ओळख ठरत असते.
या प्रकरणात दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं. याबाबत लेखी म्हणणं मांडण्याचं आयोगाने सांगितलं आहे. त्यानुसार ते मांडण्यात येईल. यानंतर निवडणूक आयोग पुढील निर्णय घेईल, असं खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदेंच्या मुख्य नेतेपदाबाबत बोलताना ते म्हणाले की “आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या घटनेनुसार, या गोष्टी केल्या आहेत.”
निवडणूक चिन्हासंबंधित कायद्यानुसार, राजकीय पक्ष हा मतदारांवरून ठरत असतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या वकिलांकडून करण्यात येत असलेला युक्तिवाद ग्राह्य धरला जाणार नाही. याबाबत निकाल प्रलंबित असल्याने त्याविषयी आता जास्त बोलणं योग्य ठरणार नाही, असं एकनाथ शिंदे यांच्या वकिलांच्या पथकातील अड. निहार ठाकरे यांनी म्हटलं.