संगमनेर : गुरुवार दि.६ एप्रिल पूर्वी संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात काढणीस आलेला कांदा,हरभरा व इतर पिके काढून घ्यावीत, तसेच काढलेली पिके झाकून ठेवावीत,कारण शुक्रवार दि.७ एप्रिल ते रविवार दि. ९ एप्रिल या तीन दिवसात संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
तालुक्यातील तळेगाव दिघे येथे सुरू असणाऱ्या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहास प्रसिद्ध हवामान तज्ञ व अभ्यासक पंजाबराव डख यांनी काल मंगळवारी सदिच्छा भेट दिली, त्याप्रसंगी ते शेतकऱ्यांशी संवाद साधत होते.यावेळी पंजाबराव डख म्हणाले की, शुक्रवार दि.७ एप्रिल ते रविवार दि.९ एप्रिल या तीन दिवसात तळेगाव दिघेसह संगमनेर तालुक्यात जोरदार पाऊस पडणार असून तत्पूर्वी शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात काढणीस आलेला कांदा,गहू,हरभरा व इतर पिके काढून घ्यावीत तसेच काढलेली पिके व्यवस्थित झाकून ठेवावीत जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार नाही.