शेतमाल व दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीसाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड प्रयत्नशील – मिनेश शाह 

0

 

कोपरगांव :

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी त्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध करुन देऊन सेंद्रीय कृषी उत्पादन वाढविण्याबरोबर त्या उत्पादीत मालाला देशाच्या बाहेर शाश्वत बाजारपेठ निर्माण करुन देण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड पुढाकार घेईल असे प्रतिपादन विकास बोर्डचे चेअरमन मिनेश शाह यांनी केले.

गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या २० व्या पुण्यस्मरण सोहळयानिमित्त संघाच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांच्या उद्‌घाटन प्रसंगी श्री शाह बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर, बैंक ऑफ इंडिया नाशिकच्या झोनल मॅनेजर सौ. जयश्री देशमुख, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डच्या मुंबई येथील फायनान्स विभाग मुख्य व्यवस्थापक सौ. स्वाती श्रीवास्तव, लातूर जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र सूर्यवंशी, बायफ संस्थेचे राज्य कार्यक्रम प्रमुख सुधीर वागळे, संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

गोदावरी दूध संघाने नव्याने उभारलेल्या लोकनेते नामदेवरावजी परजणे पाटील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील शेतकरी भवनाच्या उद्‌घाटनासह संघ कार्यस्थळावर फ्लेवर मिल्क पॅकींग स्टरलायझर मशिनचा शुभारंभ, मुरघास प्रकल्प उद्‌घाटन, पाणीवाटप  टॅंकर्सचा शुभारंभ, आंब्याच्या रोपांचे वितरण असे विविध कार्यक्रम पाहुण्यांच्याहस्ते पार पडले. याशिवाय संघाला सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या संस्था, सर्वाधिक दर देणाऱ्या संस्था, उत्तम गुणप्रतीचे व विनानाश दूध पुरविणाऱ्या संस्थांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. दूध उत्पादकांसाठी श्री नामदेवराव परजणे पाटील पशुपालक सुरक्षा १० लाखाचा अपघाती / अपंगत्व विमा योजनेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.

यापूर्वी दुग्धव्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखला जात होता. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. कृषी व्यवसाय विस्कळीत झाल्याने दुग्धव्यवसाय प्रमुख व्यवसाय बनलेला आहे असे सांगून श्री शाह पुढे म्हणाले, शेतकरी वर्ग या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळत असल्याने आगामी काही वर्षात जागतिक दुधाच्या उत्पादनात भारताचा वाटा सुमारे एक तृतियांशपर्यंत वाढेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कृषी मालावरोबरच दुग्धजन्य पदार्थाचा निर्यात बाजारपेठेतील वाटाही वाढविण्याची गरज निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रात दुधाला चांगला दर मिळत नाही अशी दूध उत्पादकांची तक्रार आहे. या तक्रारींची दखल घेऊन आम्ही त्यावर मार्ग काढू. दूध उत्पादक टिकला तरच दुग्धव्यवसाय टिकेल, महाराष्ट्रात आठ कोटी शेतकरी आज दुग्धव्यवसायाबरोबरच इतर सहकारी संस्थांशी  जोडलेला आहे. अशा सर्व शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड काही धोरणे ठरविणार आहे असे सांगून गोदावरी दूध संघाच्या कार्यक्षेत्रात संघाने  बायफच्या सहकार्याने राबविलेला सॉर्टेडसिमेनचा प्रयोग यशस्वी झालेला आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून संघाने दूध उत्पादकांना लाभ मिळवून दिलेला आहे. स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांनी संघाच्या उभारणीपासून तो भरभराटीस येण्यासाठी दिलेले योगदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचेही श्री शाह यांनी सांगितले.

संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी दुग्धव्यवसायात सहकारी आणि खाजगी अशी मोठी स्पर्धा वाढलेली आहे. प्रामाणिकपणे व्यवसाय करणारे शेतकरी स्पर्धेत भरडले जात आहेत. विविध प्रकारची अमिषे दाखवून त्यांना फसविले जात आहे. सहकारी संस्थांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगून या बाबी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या निदर्शनास आणून देऊन काही ठोस धोरणे राबविण्याच्यादृष्टीने आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी श्री परजणे यांनी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे अध्यक्ष मिनेश शाह यांच्याकडे केली.

यावेळी महानंदचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर, बॅंक ऑफ इंडियाच्या झोनल मॅनेजर जयश्री देशमुख, लातूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी यांचीही भाषणे झालीत. कार्यक्रमास दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघाचे संचालक विवेक परजणे यांनी आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here