देवळाली प्रवरा / प्रतिनिधी,
राहुरी तालुक्यातील कनगर येथे शेतीच्या वादातून एका दलित कुटुंबांवर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याने चार महिलांसह दोन पुरुष असे सहा जण गंभिर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली असून या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सोमवारी राञी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सदर घटनेची वार्ता समाज माध्यमातून समजताच राहुरी पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला होता.दि.८ रोजी दाखल केलेल्या ॲट्रोसीटीचा गुन्ह्यात आरोपीला ताब्यात घेतले असते तर लाहुंडे कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाला नसता.प्राणघातक हल्ला होत असताना 112 ला माहिती देवूनही पोलिस माञ तब्बल तीन तासा नंतर घटनास्थळी पोहचले.हल्ला करणाऱ्या तरुणाने कनगर गावात दहशत निर्माण केली आहे.गावातील अनेकांना मारहाण केली असल्याचे लाहुंडे कुटुंबाने पोलिसांना सांगितले आहे.पोलिस माञ हल्लेखोर तरुणास पाठीशी घालीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या घटनेबाबत समजलेली माहिती अशी, राहुरी तालुक्यातील कनगर येथे जुन्या शेत जमिनीच्या वादातून लाहुंडे कुटुंबावर गावातील संपत ऊर्फ विकास हरीभाऊ गोसावी या तरुणाने बाहेरून सुमारे १० ते १५ जणांना बोलवून घेतले.मातंग समाज राहत असलेल्या वस्तीत जावून लाहुंडे कुटुंबातील महिलांशी झटापट करून त्या महिलांवर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत चार महिला गंभिररित्या जखमी झाल्या आहेत. तर त्याच कुटुंबातील दोघांना बेदम मारहाण करून त्यात दोन पुरुष जखमी झाले आहेत. त्यानंतर गडबड गोंधळ ऐकून घटनास्थळी गावातील लोक जमा होताच तेथून त्या टोळक्याने पळ काढला. ही घटना घडल्यानंतर यातील जखमींवर राहुरीच्या ग्रामिण रूग्णालयात उपचार केल्यानतंर या घटनेची राहुरी पोलीसात फिर्याद दाखल करण्याचे काम सोमवारी राञी उशिरापर्यंत सुरू होते.
या शेत जमिनीच्या वादातून रविवार दि. ८ सप्टेबंर रोजी या घटनेतील मुख्य आरोपीच्या विरोधात राहुरी पोलीसात ॲट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच गोष्टीचा राग धरून सोमवारी सायंकाळी हल्ला करण्यात आल्याची चर्चा उपस्थित नातेवाईकांमध्ये सुरू होती. सदरील घटना घडल्यानंतर आरोपी विरोधात फिर्याद देण्यासाठी लाहूंडे कुटुंबाच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. या झालेल्या प्राणघातक हल्ल्यामध्ये जखमीं महिलांची नावे संगिता राधाकिसन लाहूंडे, पुष्पा बाळासाहेब लाहूंडे, अनिता विजय लाहूंडे, रेखा श्रीराम लाहूंडे, राधाकिसन नारायण लाहूंडे, बाळासाहेब नारायण लाहुंडे, अशी आहेत.
सदरील घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून गुन्हेगारी जगताने पुन्हा डोके वर काढल्याची चर्चा होत असून या घटनेची पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दखल घेऊन या घटनेतीलआरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना केले आहे.
लाहुंडे कुटुंबावर हल्ला करणारे संपत ऊर्फ विकास हरीभाऊ गोसावी, गणपत हरीभाउ गोसावी, अशोक ऊर्फ ढवळ्या रघुनाथ माळी, रा. कणगर, तसेच गोविंद ऊर्फ गोयंद्या, सुदाम ऊर्फ सुद्या, व नादऱ्या, रा. बारागाव नांदुर, ता. राहुरी. या सहा जणांवर गुन्हा रजि. नं. ९८९ भारतीय न्याय संहिता कलम १८९ (२), १९१ (२), १९१ (३), १९०, ११९ (१), ११८ (१), ७४, ७६, ३५२, ३५१ (२), ३५१ (३), ७९ तसेच अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम ३ (१) (आर), ३ (१) (एस), ३ (१) (डब्लू), ३ (१) (डब्लू) (आय), ३ (१) (डब्लू) (आय, आय), ३ (२) (व्हिए) प्रमाणे मारहाण, प्राणघातक हल्ला व ॲट्रोसीटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण
वन विभागाच्या जमिनितून मुरुमाचे उतखणन करण्यास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विरोध केला असता.या विभागाच्या तीन हि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती.वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दहशतीला घाबरुन मारहाण करणाऱ्या या तरुणा विरोधात फिर्याद दिली नाही. या तरुणाने बाहेरील तरुणांना हाताशी धरुन कनगर गावात दहशत निर्माण करीत असल्याचे लाहुंडे कुटुंबाने सांगितले आहे.
कनगर झाले बिहार
कनगर गावात गेल्या अनेक दिवसा पासुन हा तरुण दहशत निर्माण करीत आहे.अवैध धंदे करणाऱ्यांना हताशी धरुन गावात दहशत बसविण्याचा प्रयत्न करीत आहे. तंटामुक्ती अध्यक्ष,माजी पोलिस पाटील,काही प्रतिष्ठीत नागरीकांना या तरुणाने मारहाण करुन दहशत निर्माण केली आहे.एका राजकीय नेत्याच्या व एका संघटनेच्या जिल्हाध्यक्षाच्या पाठबळावर दहशत करीत असल्याचे मातंग समाजाच्या तरुणांनी सांगितले आहे.