शिर्डी, दि.१६ मे २०२३ (उमाका वृत्तसेवा) – ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गंत महसूल प्रशासनाने विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले दाखले वितरणांसाठी विशेष मोहीमेचे आयोजन केले आहे. दहावी व बारावीचा निकाल लवकरच लागणार आहे. या दोन्ही इयत्तांच्या निकालनंतर पुढील प्रवेशासाठी विविध दाखले घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी सेतू केंद्रात होते. ही गर्दी टाळण्यासाठी, विद्यार्थ्यांना विनासायास दाखले मिळण्यासाठी १५ जून २०२३ पर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी उपक्रम, मेळावे, मोहीमांचे आयोजन करण्यात येत आहे. यात महसूल प्रशासन ही पुढे सरसावले असून आपले सी.एस.सी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र व महा ई-सेवा केंद्र (सेतू) यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला, नॉन क्रिमिलेअर, जातीचा दाखला आदी दाखले ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्याचे प्राधान्य दिले आहे.
महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी विविध दाखल्यांसाठी नागरिकांची गर्दी होते. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असल्याने प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. यातून विद्यार्थी, पालक व शासकीय कर्मचारी यांच्यात वादावादी होते. दाखल्यांसाठी अर्ज करतांना नागरिकांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागते. तसेच अर्जामध्ये त्रुटी असल्यास पुन्हा कार्यालयात यावे लागते. प्रवेश प्रक्रियेच्या कालावधीत दाखला मिळाला नाही तर विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याचा धोका असतो. तेव्हा विद्यार्थ्यांच्या निकालाची वाट न पहाता आताच दाखल्यांसाठी अर्ज करण्याचे आवाहन संगमनेर, शिर्डी व श्रीरामपूर उपविभागीय कार्यालयांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
विविध दाखले व आवश्यक कागदपत्रे-
जातीचा दाखला- स्वयंघोषणापत्र, आधारकार्ड, रहिवास दाखला, विद्यार्थ्यांचा स्वतः चा जात नोंद असलेला शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा व आजोबाचा शाळा सोडल्याचा दाखला, शाळा रजिस्टर प्रवेश निर्गम उतारा,किंवा रक्ताच्या नात्यातील जातीचा पुरावा आदी कागदपत्रे.
उत्पन्नाचा दाखला – अर्ज, स्वयंघोषिणा पत्र, फोटो, विजेचे बिल, करपावती, रेशनकार्ड यापैकी एक, फॉर्म -१६, किंवा तलाठ्याकडील उत्पन्नाचा दाखला यापैकी एक आदी कागदपत्रे .
वय-राष्ट्रीयत्व ,अधिवास दाखला – स्वयंघोषणापत्र , फोटो, विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला, तसेच वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला, दहा वर्षांच्या रहिवास पुराव्यासाठी विजेचे बिल अथवा महापालिकेची करपावती, आधारकार्ड यापैकी एक आदी कागदपत्रे .
नॉन क्रिमीलियर प्रमाणपत्र – स्वयंघोषणापत्र,फोटो, लाभार्थ्यांचे जात प्रमाणपत्र, लाभार्थी व वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, तीन वर्षांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड किंवा विजेचे बिल, आधारकार्ड आदी कागदपत्रे.
आर्थिक दृबल घटकांसाठी प्रमाणपत्र- स्वयंघोषणापत्र, फोटो, उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, १९६७ पासून महाराष्ट्रातील वास्तव्याचे पुरावे, लाभार्थी व वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, विजेचे बिल, करपावती, आधारकार्ड यापैकी एक.
‘डिजिटल’चाही पर्याय – आपले सरकार या संकेतस्थळावरून डिजिटल स्वाक्षरी असलेले दाखले ऑनलाईन मिळणार आहेत. यासाठी अर्जदाराने आपले सरकार संकेतस्थळावर जाऊन लॉग-इन करणे आवश्यक आहे.ऑनलाईन आवश्यक ती माहिती भरल्यानंतर तसेच कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज ऑनलाईन स्विकारला जाणार आहे. त्यानंतर अर्जदाराला ई-मेल द्वारे तसेच या संकेतस्थळावर डिजिटल स्वाक्षरी असलेले दाखले विनाविलंब मिळणार आहेत.