श्रीरामपूर येथील ‘महिला शक्ती’ बहुमाध्यम चित्रप्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

0

शिर्डी, श्रीरामपूर : – केंद्रीय संचार ब्युरो (अहिल्यानगर) यांच्यामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त श्रीरामपूर येथे आयोजित तीन दिवसीय ‘ महिला शक्ती’ या बहुमाध्यम चित्रप्रदर्शनाचा आमदार हेमंत ओगले यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. या प्रदर्शनास विद्यार्थी, महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

इंडियन रेड क्रॉस सोसायटी (श्रीरामपूर), एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, पंचायत समिती (श्रीरामपूर) व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या समारोप कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी शोभा शिंदे, केंद्रीय संचार ब्यूराचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी फणिकुमार, शिर्डी माहिती अधिकारी सुरेश पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक मच्छिंद्र कुरे, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सचिव सुनील साळवे, सामाजिक कार्यकर्ते सचिन गुजर, शरद नवले आदी उपस्थित होते.

आमदार ओगले म्हणाले की, महिला शिक्षित झाली, तर ती संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करते. महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून बॅंकेतून कर्ज घेऊन विविध व्यवसाय सुरू करून सक्षमीकरणासाठी पाऊल टाकावे. यावेळी अनंता जोशी, सुरेश पाटील, सुनील साळवे, सचिन गुजर, शरद नवले यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक शोभा शिंदे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये क्रमांक मिळविणाऱ्या महिलांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

श्रीरामपूर नगरपरिषदेच्या आगाशे सभागृह व आझाद मैदान, लोकमान्य टिळक वाचनालय येथे हे मल्टीमीडिया प्रदर्शन ६ ते ८ मार्च कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात नगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. बचत गट, महिला मंडळ, अंगणवाडी महिलांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. पाककला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, संगीतखुर्ची, ‘होम मिनिस्टर’ यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रदर्शनात पद्म पुरस्कार विजेत्या भारतीय महिला, महिला स्वातंत्र्यसैनिक, संरक्षण दलातील महिलांची भूमिका, नव्या भारतातील महिला शक्ती, ग्रामीण भागातील यशस्वी महिला उद्योजक आणि भारतीय महिला वैज्ञानिकांची माहिती चित्ररूप आणि मल्टीमीडिया स्वरूपात सादर करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here