बहुरंगी लढतीत मतविभाजनाचा फायदा काँग्रेसच्या पथ्यावर पडणार
(श्रीरामपुर मतदारसंघ वार्तापत्र : राजेंद्र उंडे )
श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. या मतदार संघामध्ये इच्छुकांची गर्दी असली तरी प्रामुख्याने बहुरंगी लढतीचे चित्र आहे.त्यामुळे चांगलीच चुरस निर्माण झाल्याचे पहायला मिळते. जाहीर सभेबरोबरच सोशल मीडियातून होणाऱ्या आरोप- प्रत्यारोपांबरोबरच भेटीगाठी, पदयात्रा यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.या मतदार संघात प्रामुख्याने तिरंगी लढत मानली जात असली तरी हिंदुत्वाची लढाई येथे पुढे केली असल्याने मतांचे विभाजन काँग्रेसच्या पथ्यावर पडणार असल्याचे संकेत मतदारांमधुन बोलले जात आहे.श्रीरामपूर तालुक्यातील 54 गावे तर राहुरी तालुक्यातील 32 गावे या मतदार संघात आहेत.राहुरी तालुक्यातील 32 गावातील मतदारांचे मत दर पंचवार्षिकमध्ये निर्णायक ठरत आले आहे.
महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हेमंत ओगले,महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गटाचे) उमेदवार आमदार लहु कानडे, शिवसेना शिंदे गटाचे माजी आ. भाऊसाहेब कांबळे, अपक्ष सागर अशोक बेग, वंचीत आघाडीचे आनंद उर्फ अण्णासाहेब मोहन, मनसेचे राजाभाऊ कापसे तसेच तिसरी आघाडी स्वराज्य पक्षाचे पढेगावचे भुमीपुत्र जितेंद्र तोरणे हे सात प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय अन्य बारा जणही आपले नशीब आजमावत आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये झालेल्या लढतीमध्ये माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांनी पक्षांतर केल्याने त्यांच्यावर मतदारांची नाराजी होती. त्याचा फायदा ऐनवेळी काँग्रेसची उमेदवारी मिळविणारे माजी प्रशासकीय अधिकारी लह कानडे यांना झाला.अवघ्या पंचविस दिवसांमध्ये ते आमदार झाले होते. त्यावेळी लहु कानडे यांच्याबरोबर माजी आ. स्व. जयंतराव ससाणे गट असल्याने त्यांचा विजय सुकर झाला.परंतु काही दिवसांमध्येच त्यांच्यात राजकीय मतभेद आल्याने आ. लहु कानडे यांनी ससाणे गटापासून विभक्त होत आपला स्वतंत्र गट निर्माण करुन पाच वर्षामध्ये श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे.परंतु यंदा काँग्रेस पक्षाने त्यांचे तिकीट कापल्याने मागील पंचवार्षिक प्रमाणे त्यांनी ऐनवेळी महायुतीमध्ये जावून राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गटाकडून) उमेदवारी मिळविली. महाआघाडीचे काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगले यांच्यासाठी ससाणे गटाने कंबर कसली आहे.
जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, माजी उपनगराध्यक्ष संजय फंड, सचीन गुजर, बाबासाहेब दिघे, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, शिवसेना उबाठाचे संजय छल्लारे,सचिन बडदे आदींसह माजी आ.स्व. जयंतराव ससाणे गटाबरोबर महाआघाडीचे पदाधिकारी मतदार संघ पिंजून काढत आहे.त्यांच्याकडून गावोगावी प्रचार सभा तसेच शहरातही कॉर्नर सभांनी जोर धरला आहे. काँग्रेसचे स्टार प्रचारक राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांची शहरात जाहीर सभा झाली. तसेच खा. निलेश लंके यांच्या सभा उंदिरगाव, टाकळीभान या ग्रामीण भागामध्ये झाल्या आहे. आ. लहू कानडे यांना महायुतीकडून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्याने शहरातील भाजपा, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांत नारजी निर्माण झाली होती. ते बंडखोरी करण्याच्या तयारीत होते. परंतु पक्षांच्या वरिष्ठ पुढाऱ्यांनी त्यांची नाराजी दूर करुन आ. लहू कानडे यांच्या प्रचारामध्ये सक्रीय केले आहे. लहू कानडे यांचा प्रचाराचा नारळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. तसेच राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची येथील थत्ते मैदानावर जाहीर सभा झाली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव अविनाश
आदिक, माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरातील व तालुक्यातील पदाधिकारी, विखे समर्थक व भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, भाजपाचे शहरातील व तालुक्यातील पदाधिकारी कानडे यांची प्रचार यंत्रणा सांभाळत आहेत.माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांनी माघारीच्या दिवशी नॉटरिचेबल होवून माघार न घेता मुख्यमंत्र्यांच्या पाठबळावर बंडखोरी केली. त्यांनीही आपली प्रचार यंत्रणा सज्ज केली आहे. भाजपाचा एक गट त्यांच्या प्रचार यंत्रणेत सहभागी आहे. भाजपाचे प्रकाश चित्ते यांचा गट कांबळे यांची प्रचार यंत्रणा सांभाळत आहे. कुणीही प्रस्थापित माझ्याबरोबर नाही.परंतु, मायबाप जनता आपल्या पाठीशी असल्याची भावना कांबळे यांनी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचा आदेश आला तरी माघार नाही, अशी भूमिका घेतली आहे.एकीकडे राजकीय पक्षांचे मातब्बर
असताना केवळ हिंदुत्व हा मुद्दा बरोबर घेवून राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक सागर अशोक बेग हे अपक्ष निवडणूक लढवित आहेत. मतदार संघातील मोठा तरुणवर्ग त्यांच्यासोबत आहे. अनेकांनी स्वखर्चाने निवडणूक बॅनर लावून प्रचार सुरू केला आहे.तालुक्यातील पढेगावचे भूमीपुत्र जितेंद्र तोरणे हे तिसरी आघाडी स्वराज्य पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहेत. ते एकाकी झुंज देत असून पढेगाव येथील उद्योजक रणजित बनकर यांची त्यांना खंबीर साथ मिळत आहे. वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचितची उमेदवारी आनंद उर्फ अण्णासाहेब मोहन यांना दिली आहे. मोहन हे तालुक्यातील गोवर्धन येथील आहेत. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात लोकसभेला वंचितच्या उमेदवारास चांगली मते मिळाली होती.
आता विधानसभेला आनंद मोहन यांना त्याचा किती फायदा होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. वंचितचे तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन हे वंचितच्या उमेदवाराची प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. मनसेची उमेदवारी राजाभाऊ कापसे करीत असून त्यांनीही प्रचार फेऱ्यांवर भर देवून प्रचारात आघाडी घेतली आहे. आकाश सुरेश शेंडे (बहुजन समाज पार्टी),चंद्रकांत संभाजी दोंदे (विकास इंडिया पार्टी), राजेंद्र दत्तात्रय आव्हाड (जय हिंद भारत राष्ट्रीय पार्टी), सूर्यकांत विश्वनाथ आंबडकर (राष्ट्रीय समाज पक्ष), अर्जुन सुदाम शेजवळ (अपक्ष), अशोक मच्छिंद्र लोंढे (अपक्ष), भाऊसाहेब शंकर पगारे (अपक्ष), विश्वनाथ शंकर निर्वाण (अपक्ष), अँड. सिद्धार्थ दीपक बोधक (अपक्ष) हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूणच श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक मातब्बरांच्या प्रचार सभा झाल्या आहेत, तर अजून अनेकांच्या बाकी आहेत. मतदान प्रक्रीयेस आठ दिवस बाकी आहेत. ऐन थंडीमध्ये निवडणुकीने वातावरण चांगलेच तापले आहे.
मागिल पंचवार्षिकतेची पुर्नरआवृत्ती होणार का?
गेल्या पंचवार्षिकमध्ये झालेल्या लढतीमध्ये माजी आ.भाऊसाहेब कांबळे यांनी पक्षांतर केल्याने त्यांच्यावर मतदारांनी नाराजी व्यक्त केल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.त्याचा फायदा ऐनवेळी काँग्रेसची उमेदवारी मिळविणारे माजी प्रशासकीय अधिकारी लहु कानडे यांना झाला.अवघ्या पंचविस दिवसांमध्ये ते आमदार झाले.त्यावेळी लहु कानडे यांच्याबरोबर माजी आ.स्व. जयंतराव ससाणे गट असल्याने त्यांचा विजय सुकर झाला.या निवडणूकीत आ.कानडे यांनी पक्षांतर केल्याने त्यांच्यावरही मतदारांची नाराजी व्यक्त होणार का? तसे झाल्यास मागिल पंचवार्षिकेची पुर्नरआवृत्ती होईल.गेल्या निवडणूकीत राहुरी तालुक्यातील 32 गावातील मतदारांनी नाराजी व्यक्त केली होती.या हि निवडणूकीत 32 गावातील मतदार नाराजी व्यक्त करणार का?तसे झाल्यास श्रीरामपूरचा आमदाराचे भवितव्य राहुरी तालुक्यातील 32 गावातील मतदारांच्या हाथी असल्याची चर्चा सुरु आहे. काँग्रेसचा नविन चेहरा आमदार होणार का? श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात आहे. मतविभाजनाचा फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला होणार असल्याचे राजकिय अभ्यासक यांच्याकडून सांगितले जात आहे.