श्रीराम नवमीला साईंचे दर्शन सौभाग्याची गोष्ट :- अभिनेत्री दीपिका  

0

श्री साईगाव पालखीचे सपत्नीक पूजन करून आ.आशुतोष काळेंनी साई भक्तांना दिल्या शुभेच्छा

कोळपेवाडी वार्ताहर  – श्री साईगाव पालखी व मुंबादेवी तरुण मंडळ यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याहीवर्षी श्री राम नवमीनिमित्त कोपरगाव वरून शिर्डीला जाणाऱ्या साई पालखीचे आ. आशुतोष काळे व त्यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी आ. आशुतोष काळे हे देखील सपत्नीक साई पालखी सोहळ्यात सहभागी झाले व त्यांनी साई भक्तांना शुभेच्छा दिल्या.

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात श्रीराम नवमी उत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी श्रीराम नवमी निमित्त शिर्डीला जाणाऱ्या श्री साईगाव पालखीला आ. आशुतोष काळे व त्यांच्या पत्नी सौ. चैतालीताई काळे यांनी खांदा देवून जय श्रीराम व साई बाबांच्या नाम घोषात साई पालखी साईंच्या भेटीसाठी शिर्डीकडे मार्गस्थ झाली. यावेळी कोपरगाव शहरासह तालुक्यातील हजारो साई भक्त या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. कोपरगाव-शिर्डी पालखी मार्गावर ठिकठिकाणी थंड पाणी, प्रसाद, ताक, सरबत आदी व्यवस्था करण्यात आली होती. आ. आशुतोष काळे व सौ.चैतालीताई काळे यांनी साई भक्तांना ताक, सरबत यांचे वाटप करण्याची सेवा केली. तसेच शिर्डीमध्ये देश विदेशातून येणाऱ्या साई भक्तांची मोठी गर्दी झाली असल्यामुळे सर्व साई भक्तांनी सुखरूपपणे घरी पोहोचण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी अशा काळजीवजा सूचना केल्या.यावेळी साई भक्तांच्या चेहऱ्यावर उत्साह  ओसंडून वाहत होता.

या वर्षी या साई गाव पालखी सोहळ्यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने प्रसिद्ध रामायण मालिकेत सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चीखलिया यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी देखील कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे निमंत्रण स्वीकारून या भव्य दिव्य साई गाव पालखी सोहळ्याला उपस्थित राहून साई पालखीला खांदा देवून साई भक्तांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना अभिनेत्री दीपिका चीखलिया म्हणाल्या की, अनेकवेळा साईंच्या दर्शनासाठी आल्यानंतर साई बाबांच्या अनेक पालख्या मी पाहिल्या आहेत. मात्र एवढा मोठा पालखी सोहळा आज प्रथमच पाहत आहे. एवढी गर्दी असूनही केलेले योग्य नियोजन, साई भक्तांचा उत्साह व या पालखी सोहळ्यात मला सहभागी होता आले त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. मात्र ज्यांच्यामुळे मला हे भाग्य मिळाले व श्रीराम नवमीच्या दिवशी साईबाबांचे दर्शन भेटले हि माझ्यासाठी अद्वितीय गोष्ट असून हे सौभाग्य मला आ. आशुतोष काळे व कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळामुळे मिळाले असल्याचे सांगितले. श्रीराम नवमीच्या साई पालखी सोहळ्याला स्वत: सीता माता उपस्थित असल्यामुळे साई भक्तांचा देखील उत्साह वाढला होता.

या पालखी सोहळ्यासाठी श्री साईगाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मंडळाचे सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here