श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते गोकुळनगरी रस्त्याचे काम तातडीने सुरु करा : आ.आशुतोष काळे

प्रशासकीय मान्यता मिळालेल्या विकास कामांच्या निविदा तातडीने प्रसिद्ध करण्याचा पालिकेला सूचना

0

कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते गोकुळनगरी पूल रस्त्याचे काम तातडीने सुरु करून प्रशासकीय मान्यता मिळालेल्या विकास कामांच्या निविदा तातडीने प्रसिद्ध करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला दिल्या आहेत.

कोपरगाव शहराच्या रस्ते व विविध विकास कामांसाठी दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून अनेक विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्या आहेत मात्र नगरपरिषद प्रशासनाकडून या कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. तसेच श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते गोकुळनगरी पूल रस्त्याचे थांबलेले काम नागरिकांची डोकेदुखी वाढवत आहे. विकास कामांच्या बाबतीत कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून सातत्याने होत असलेला हलगर्जीपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही अशी तंबी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला दिली आहे.

त्याचबरोबर पाणी पुरवठा नियोजन, विकास कामांचे नियोजन व कोपरगाव शहरातील इतर विकास कामांकडे लक्ष देवून ती विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करा. ब्राम्हण समाज मंदिर, नाभिक समाज मंदिर, सुतार लोहार समाज मंदिर, गजानन नगर कब्रस्थान, नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नं. १०५ मधील नवीन कब्रस्थान या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्या आहेत. नगरपरिषद प्रशासनाकडून या कामाच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. या कामांच्या देखील निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध करा. सुरु असलेली विकास कामे दर्जेदार होतील याची गांभीर्याने काळजी घेवून नागरिकांच्या तक्रारी येणार नाही याची दक्षता घ्या. नागरिकांनी देखील आपापल्या प्रभागात सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी करून हक्काने चांगल्या दर्जाची कामे करून घ्यावीत असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here