संजीवनी विद्यापीठात ‘नेतृत्व संवाद’ मालिके अंतर्गत व्याख्यान
कोपरगांव: खरे नेतृत्व गुण असणारी व्यक्ती येणाऱ्या संकटांचा वेध घेवुन त्यांच्याशी सामना करून ते येवुच नये यासाठी नियोजन करते. समजा संकट आलेच तर अशा व्यक्ती संकटांची तिव्रता कमी करू शकतात. यासाठी चांगली मानसिकता हवी असते. मन नकारात्मकतेने भरलेले असल्यास आपण संकटांवर मात करू शकत नाही, संकटांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी वाटाघाटी कौशल्ये महत्वपूर्ण ठरतात, असे प्रतिपादन प्रसिध्द आर्थोपेडिक सर्जन डॉ. भरत केळकर यांनी केले.
संजीवनी विद्यापीठ अंतर्गत स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या वतीने बीबीए, बी. कॉम व एमबीए च्या विद्यार्थ्यांसाठी ‘नेतृत्व संवाद’ या विषयावर व्याख्यान मालिका चालविली जाते. या मालिकेत डॉ. केळकर प्रमुख वक्ते म्हणुन बोलत होते. प्रारंभी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी डॉ. केळकर यांचा सत्कार करून स्वागत केले. याप्रसंगी चिफ टेक्निकल ऑफिसर विजय नायडू, डॉ. सतिश अजमेरे, संजीवनी विद्यापीठाच्या प्रो व्हाईस चांसलर डॉ. जे जानेथ, डीन डॉ. कविथा राणी, स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटचे डीन डॉ. विनोद मालकर, बीबीए विभागाचे प्रमुख प्रा. सुधांशू भट्ट, आदी उपस्थित होते. सदर प्रसंगी डॉ. केळकर यांनी नेतृत्व, संकट व्यवस्थापन, वाटाघाटी, आदी विषयांना स्पर्श केला. प्रारंभी डॉ. मालकर यांनी ‘नेतृत्व संवाद मालिका’ या सदराचे का आयोजन केल्या जाते व त्याचे काय फायदे अनुभवायला मिळत आहे, याचे स्पष्टीकरण दिले. संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
डॉ. केळकर यांनी सारिया, येमेन व इराक मधिल युध्दांमध्ये स्वयंस्फुर्तीने जखमी जवानांना वैद्यकिय सेवा दिली. या सेवेचे व युध्दाची चित्तथरारक ध्वनीचित्रफित त्यांनी विद्यार्थ्यांना दाखविली. कठीण परीस्थितही तेेथे त्यांनी कशी सेवा दिली, याची माहिती देवुन सर्वांनाच धिरगंभिर केले.
डॉ. केळकर पुढे म्हणाले की नेतृत्व गुण जोपासण्यासाठी प्रत्येकाने दुसऱ्याच्या बोलण्याला प्रतिसाद दिला तर तो लागलीच आपला होतो. त्याचप्रमाणे आपले मन एककल्ली राहुच नये यासाठी मनाची लवचिकता हवी. हा आपला लवचिक स्वभाव तयार करण्यासाठी ध्यानधारणा करावी. संकटाच्या अथवा संघर्षाच्या वेळी ध्यानधारणेमुळे मन शांत राहण्यास मदत होते. भावना किंवा तिव्र आंतरीक इच्छा व्यक्तींना संकटात तोंड देण्यास मदत करू शकते. प्रभावी संकट व्यवस्थापनाची सुरूवात स्वतःपासुन करावी. आपण भावनांचे व्यवस्थापन केले पाहीजे. आपल्याला संघटक होवुन नेतृत्व करायचे असेल तर अगदी टोकाच्या प्रसंगातही आपले शब्द जपुन वापरायचे असतात. कारण शब्द ही संपत्ती असते जी विश्वास निर्माण करते. केवळ जिंकण्यावर भर न देता शांत राहण्याचा सल्ला त्यांनी दिली कारण आंतरिक शांतता हा एक यशाचा प्रकार आहे, असे डॉ. केळकर शेवटी म्हणाले.
प्रा. सुधांशू भट्ट यांनी आभार मानले.