संगमनेर : चंद्रकांत शिंदे
संगमनेर शहराजवळील नदीपात्रातून सातत्याने सुरू असणारी वाळूची तस्करी रोखण्यासाठी आता संगमनेरचा महसूल विभाग ॲक्शन मोड मध्ये आला आहे. त्याचाच परिणाम म्हणून काल गुरुवारी सकाळी तस्करी करणाऱ्या दोन वाळूच्या रिक्षा महसूलच्या पथकाने जप्त केल्या, तसेच महसूल अधिकाऱ्यांची वाळू तस्करांना खबर देणाऱ्या खबऱ्याची दुचाकीही यावेळी जप्त करण्यात आल्याने आता शहरातील वाळू तस्करांबरोबर त्यांना खबर देणाऱ्या खबऱ्यांचेही धाबे दणाणले आहे.
संगमनेर शहराजवळून वहात असणाऱ्या नदीपात्रातून रात्रीच काय दिवसाढवळ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात संगमनेर शहरातील वाळू तस्करांकडून वाळूचा उपसा सुरू होता. यावर अनेकदा संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम आणि त्यांच्या पथकाने कारवाया देखील केल्या, मात्र ही वाळू तस्करी आटोक्यात येण्याचे नाव घेत नव्हती. वेगवेगळ्या क्लुप्त्या करून वाळू तस्करांनी संगमनेरच्या महसूल विभागाला भंडावून सोडले होते. त्यामुळे सहाजिकच संगमनेरच्या महसूल विभागाला टीकेचे धनी बनावे लागले होते. त्यामुळे काल गुरुवारी तहसीलदार अमोल निकम यांच्या पथकाने शहराजवळील गंगामाई घाटावर आणि कसारा दुमाला येथे अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या दोन रिक्षा जप्त केल्या तसेच अधिकाऱ्यांची खबर वाळू तस्करांना देणाऱ्या खबऱ्याची विना नंबर दुचाकी यावेळी जप्त करण्यात आली. यावेळी खबऱ्या आपली दुचाकी सोडून पळून गेला. महसूल विभागाचे अधिकारी या खबऱ्याची माहिती काढत आहेत. रिक्षातील वाळू तसेच गंगामाई घाटावर असणारे वाळूचे साठे या पथकाने नष्ट केले. तसेच वाळूने भरलेल्या गोण्या पेटवून दिल्या. दरम्यान वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल विभाग कितीही प्रामाणिक प्रयत्न करत असला तरी सराईत वाळू तस्कर महसूलच्या या कारवायांना घाबरेनासे झाले आहेत. त्यामुळे वाळू तस्करीचा बिमोड करण्यासाठी ठोस कारवाईची गरज आहे. दोनच दिवसांपूर्वी वाळू तस्करीतून आपल्या तुंबड्या भरणाऱ्या संगमनेर शहरातील दोन आणि तालुक्यातील एका वाळू तस्कराला संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. अशा धडाकेबाज कारवाया वाळू तस्करांवर झाल्या तर आणि तरच तालुक्यात फोपावलेली वाळू तस्करी आटोक्यात येऊ शकते.
चौकट :- महसूलच्या पथकाने तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात वाळू तस्करीला लगाम घालण्याच्या दृष्टीने पावले उचलली असली तरी तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र वाळू तस्कर सुसाट सुटले आहेत. तालुक्यातील प्रवरा नदीकाठी असणाऱ्या गावातून गेल्या दोन दिवसापासून मध्यरात्री वाळू तस्करांकडून वाळूची खुलेआम तस्करी सुरू झाली आहे. त्यामुळे आता महसूलच्या पथकाला ग्रामीण भागात बोकाळलेली वाळू तस्करी विशेष पथक तयार करून आटोक्यात आणावी लागणार आहे, तसेच या वाळू तस्करांवर गुन्हे दाखल करत हद्दपारीची वेसन घालावी लागणार आहे.