संगमनेरमध्ये शिवजयंती निमित्त निघालेल्या भव्य मोटार सायकल रॅलीने वेधले लक्ष 

0

संगमनेर : शहर व तालुक्यात शिवजयंती निमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती फाउंडेशन संगमनेर संचालित, शिवजयंती उत्सव युवक समितीकडून भव्यदिव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. कालीचरण महाराज आकर्षण असलेल्या या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधले.

          कालीचरण महाराज, शिवव्याख्याते  प्रा. एस. झेड. देशमुख, शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहरातील चंद्रशेखर चौक येथे सकाळी  छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करण्यात आली. तदनंतर कालीचरण महाराज यांना सजविलेल्या रथात बसवून रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. या रॅलीत हजारो युवक व युवती भगवे फेटे व वाहनांना भगवे ध्वज बांधून सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे रॅलीची सांगता झाली. यावेळी कालिचरण महाराज यांनी रॅलीला संबोधित केले. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करीत असताना केवळ भारत भूमीच नव्हे तर संपूर्ण राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावे, यासाठी शपथ घ्यायला हवी. परकीयांनी आपल्या देशातील संपत्ती लुटली मात्र त्यांना आपल्या मनगटातील बळ लुटता आले नसल्याने या बळावर छत्रपतींच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण करण्याचे आवाहन  महाराजांनी केले. कालीचरण महाराज पुढे म्हणाले की, साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्य स्थापन करत छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमण थोपवले मात्र देशाचे अनेक भूभाग आक्रमकांनी  गिळंकृत केले आहे. छत्रपतींच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी एकजुटीने उभे राहत असताना परकीयांनी गिळंकृत केलेला भूभाग परत मिळवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान संगमनेर खुर्द येथील खांडगाव फाट्यावर दुपारी शिवभक्तांनी शिवज्योतीचे स्वागत केले. सायंकाळी ५ वाजता नगरपालिकेजवळून  शिवरायांच्या प्रतिमेची पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. उत्सव समिती व शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवभक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंती निमित्त तालुक्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरासह सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्याच्या गावागावात व शहरातील गल्लीबोळात शिवरायांच्या प्रतिमा व पुतळे उभारण्यात आले होते,त्यांना अभिवादन करण्यात येत होते. शिवरायांच्या जयजयकाराने परिसर दुमदुमला होता. सर्वत्र भगवेमय वातावरण होते. तालुक्यातील पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागडावर शुक्रवारी दिवसभर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम सुरु होते.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here