वाळूच्या रिक्षा दिसल्यास जाळून टाकू ; संतप्त नागरिकांचा महसूल व पोलीस प्रशासनाला इशारा
संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील,
संगमनेर शहरा नजीकच्या प्रवरा नदी पात्रातून विशेषतः गंगामाई घाट परिसरातून अवैधरित्या बेसुमार वाळूची वाहतूक दिवस-रात्र रिक्षाद्वारे सुरू आहे. या वाळूच्या रिक्षांमुळे नदीकाठी फिरण्यास जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून प्रशासनाला वारंवार सांगून देखील कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी काल बुधवारी सकाळी या वाळू तस्कराविरुद्ध एल्गार पुकारत वाळूच्या रिकाम्या गोण्यांची होळी करत ठिय्या आंदोलन केले. यापुढे नदीकाठी वाळूची रिक्षा दिसल्यास ती पेटवून देण्याचा इशारा देखील नागरिकांनी महसूल व पोलीस प्रशासनाला दिला.
राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर महसूल मंत्री पद मिळालेल्या महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवीन वाळू धोरणाची घोषणा करत अवैद्य वाळू तस्करीला लगाम घातल्याचा दावा अनेकदा केला, मात्र संगमनेर शहरात प्रवरा नदीकाठी भंडारदरा, निळवंडे धरणाचे आवर्तन सुरू असताना देखील वाळू तस्करी जोमात सुरू असल्याचे वारंवार समोर येत आहे. संगमनेर शहरातील अनेक बहाद्दर जुन्या पाण्या रिक्षा, ज्यांना नंबर नाही, छत नाही, अशा रिक्षाद्वारे वाळूची खुलेआम बिनदिक्कतपणे वाहतूक करतात. ही वाहतूक करत असताना या रिक्षा अगदी पहाटेपासून महसूल प्रशासन झोपेतून जागे होई तोपर्यंत आपला गोरख धंदा चालवतात. वाळू भरलेल्या रिक्षा शहरातून सुसाट वेगाने जात येत असल्याने या मार्गावरून सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या जेष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. एखादा अपघात होऊन निष्पाप जीवाचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाळूच्या रिक्षा अडवण्याचा प्रयत्न केला तर रिक्षा चालकाकडून दमदाटी व प्रसंगी शिवीगाळ केली जाते. त्यामुळे या वाळू तस्करां विरुद्ध शहरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. हे सर्व प्रशासनाला माहीत असून देखील कारवाई होत नसल्याने काल बुधवारी सकाळी नागरिकांच्या संतापाचा अंत झाला आणि त्यांनी प्रवरा नदी काठच्या गंगामाई घाट परिसरात एकत्र येत वाळू तस्करांविरुद्ध संघर्ष पुकारला. नदीकाठी वाळू तस्करांकडून वाळू भरण्यासाठी ठेवण्यात आलेल्या रिकाम्या गोण्या जाळत त्याची होळी केली, जर पोलिस व महसूल प्रशासन या वाळू तस्करांना रोखू शकत नसेल तर आम्ही यापुढे हे सहन करणार नाही. यापुढे वाळूने भरलेली रिक्षा आढळल्यास ती पेटवून देऊ तसेच त्याची पुढील जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशारा देखील यावेळी संतप्त नागरिकांनी दिला.यावेळी गंगामाई ट्रस्ट, पुरोहित संघ, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नागरिकांच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
चौकट : ठोस कारवाई करण्याच्या नावाने बोंबाबोंब असणाऱ्या महसूल विभागाच्या विरोधात काल सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या निसर्गप्रेमी नागरिकांनी वाळू तस्करांविरोधात दंड थोपटले. प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी वाळू तस्करांवर जागेवर येऊन कारवाई करावी अशी मागणी केली, संतप्त नागरिकांचा राग शांत करण्यासाठी संगमनेरचे कामगार तलाठी पोमल तोरणे यांना पाठवण्यात आले होते.