विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने एकाचा मृत्यू ; वीज पडून दोन गाई दगावल्या, शाळेचे पत्रे उडाले, नारळाच्या झाडावर वीज पडली
संगमनेर : शनिवारी आणि रविवारी तालुक्यातील काही गावात विजेच्या दणदणाटासह आणि ढगांच्या गडगडासह अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने कहर केला. वादळी वाऱ्याने शेतात पडलेल्या वीज वाहक तारेला स्पर्श झाल्याने निळवंडे येथे एकाचा मृत्यू झाला तर वीज पडल्याने काकडवाडीत दोन गाई जाग्यावर गतप्राण झाल्या. अंभोरे जवळील डागवाडी प्राथमिक शाळेचे पत्रे उडाले तर प्रतापपूर,कनोली,देवगाव येथे नारळाच्या झाडांनी पेट घेतल्याच्या घटना समोर आल्या. रहिमपुरात जोरदार वाऱ्यामुळे शेतात असणारे विजेचे पोल उन्मळून पडले. या सर्व घटनांमुळे शेतकऱ्यांच्या चिंता मात्र वाढल्या आहेत.
शनिवार (दि.१५) एप्रिल आणि रविवार (दि.१६) एप्रिल च्या सायंकाळी तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी पाच वाजेच्या नंतर तर काही ठिकाणी रात्री उशिरा निसर्गाचे आकड तांडव बघायला मिळाले. यावेळी आकाशात विजांचा दणदणाट कानाचे पडदे फोडू पाहत होता. सुसाट वाऱ्याने शेतात असणारी उभी पिके सु सु करत जमीन दोस्त झाली. काही ठिकाणी गारांचा तडाखा झाला तर काही ठिकाणी किरकोळ पाऊस पडला, हे होत असताना तालुक्यातील निळवंडे आणि रहिमपुरात शेतात असणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या तारा तुटल्या. निळवंडे येथे या वीज वाहक तारेला स्पर्श झाल्याने एका तरुण शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला. निळवंडे येथील विजय साहेबराव पवार (वय ४६) हे रविवार (दि.१६) एप्रिल च्या सकाळी ११ वाजेच्या सुमारास आपल्या शेतात असणाऱ्या डाळिंब बागेला छोट्या ट्रॅक्टर च्या साह्याने फवारणी करण्यासाठी गेले होते. मात्र शनिवारी झालेल्या वादळी पावसात त्यांच्या शेता वरून गेलेली वीज वितरण कंपनीची वीज वाहक तार डाळिंबाच्या बागेला झाडे पडू नाहीत म्हणून बांधलेल्या तारेवर तुटून पडली होती ही बाब विजय पवार यांच्या लक्षात आली नाही. त्यामुळे त्यांना विजेचा जोरदार धक्का बसून आपला जीव गमवावा लागला. शोकाकुल वातावरणात निळवंडे येथे रविवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी,मुले,भाऊ,बहीण,पुतणे असा मोठा परिवार आहे. एक सदन कुटुंब म्हणून पवार कुटुंबाकडे पाहिले जाते, या कुटुंबात ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दुसरी घटना काकडवाडी या ठिकाणी घडली. रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात वीज पडल्याने येथील शेतकरी राजाराम शिवनाथ मुळे यांच्या दोन गाई दगावल्या. तालुक्यातील रहिमपूर येथील भिमाजी आंबुजी शिंदे,बिरोबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या शेतात वीज वितरण कंपनीचे मेन लाईनचे पोल जोरदार वाऱ्याने उन्मळून पडले आहेत. अंभोरे जवळील डागवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पत्रे उडाल्याने शालेय साहित्याचे नुकसान झाले. तालुक्याच्या पूर्व भागातील प्रतापपूर येथील पोलीस पाटील विठ्ठल यादव आंधळे यांच्या शेतात असणाऱ्या दोन नारळाच्या झाडावर वीज पडल्याची घटना घडली. त्याचबरोबर कनोली आणि देवगाव येथेही नारळाच्या झाडावर वीज पडल्याच्या घटना घडल्या असून वीज पडल्याने नारळांनी पेट घेतल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.