कोपरगाव : ‘जागवूया ज्योत माणुसकीची’ हे ब्रीदवाक्य घेऊन गेल्या आठ वर्षांपासून अनेकविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानचा आठवा वर्धापन दिन १२ जानेवारी २०२३ रोजी साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त समाजप्रबोधनकार युवा व्याख्याते,प्रसिद्ध कवी अविनाश भारती यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा सेवक विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी, १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता कोपरगाव येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळील कलश लॉन्स येथे हा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात येणार असून, रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व युवा सेवकांनी केले आहे.
संजीवनी युवा प्रतिष्ठानने मागील आठ वर्षांत विविध सामाजिक उपक्रम राबवून केवळ कोपरगाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. युवकांचे आयडॉल अशी ओळख निर्माण केलेले विवेकभैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून १२ जानेवारी २०१५ रोजी ‘संजीवनी युवा प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही पूर्णत: बिगरराजकीय संस्था असून, सामाजिक एकता, वैद्यकीय मदत, युवा सशक्तीकरण, वृक्षारोपण, पर्यावरण या पाच उद्दिष्टांनुसार संजीवनी युवा प्रतिष्ठान नि:स्वार्थीपणे काम करत आहे. २०१५ सालापासून संजीवनी युवा प्रतिष्ठान अविरतपणे सेवाकार्य करत आहे. यासाठी प्रतिष्ठानचा प्रत्येक सदस्य अर्थात युवा सेवक प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडत आहे.
फक्त कोपरगावच नव्हे तर राज्यात जिथे कुठे नैसर्गिक आपत्ती कोसळते तिथे संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक मदतीला धावून जातात. त्या ठिकाणी जाऊन सामाजिक बांधिलकी जोपासत आवश्यक ते सेवाकार्य करतात. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली त्यावेळी स्वत: विवेकभैय्या कोल्हे यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांसोबत तेथे जाऊन पूरग्रस्तांना पाणी बॉटल, अन्नधान्य, वस्त्र, वैद्यकीय सेवा व इतर प्रकारची मदत केली. कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीला आलेल्या महापुराच्या काळात बाधित कुटुंबांना मोफत जेवण, वैद्यकीय मदत व जीवनावश्यक साहित्य पुरवले. तीन वर्षांपूर्वी कोरोना महामारीच्या काळात विवेकभैय्या कोल्हे यांनी स्वखर्चाने कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटल येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून संजीवनी उद्योग समूहाच्या मदतीने ५०० बेडचे संजीवनी डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ केअर सेंटर सुरू करून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या औषधोपचाराची, भोजनाची मोफत सोय केली. तसेच सरकारच्या पुढे दोन पावले जात तालुक्यातील जनतेसाठी जीवन-मरणाचा प्रश्न बनलेल्या ऑक्सिजन सिलिंडरची उपलब्धता करून दिली. गोरगरीब शेतकरी व सर्वसामान्य माणसांना लग्न समारंभाचा खर्च परवडत नाही हे लक्षात घेऊन २०१५ पासून संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. २०१८ मध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात २९, २०१९ मध्ये ४१ व २०२२ मध्ये १८ विवाह मोठ्या थाटामाटात सर्व खर्चासह करण्यात आले.
लोकसहभागातून ११००० वृक्षांचे संरक्षक जाळीसह वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य शिबिरे, मोफत श्रवण यंत्रे व चष्मे वाटप, २४ तास ॲम्ब्युलन्स सुविधा, तीन ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण, करिअर मार्गदर्शन, शिवजयंती उत्सव, ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कोपरगाव नगरीत रेकॉर्ड ब्रेक गर्दीत झालेले जाहीर हरी कीर्तन, रामनवमी उत्सव, गुरुपौर्णिमा उत्सव, कोपरगाव औद्योगिक वसाहतीतील जि. प. प्रा. शाळा दत्तक घेऊन विद्यार्थ्यांना मोफत शूज व सॉक्स, शालेय साहित्य वाटप,एक राखी जवानांसाठी, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, प्लास्टिक बंदीविषयी जनजागृती,मतदार जनजागृती,पाणी अडवा, पाणी जिरवा, ग्राम स्वच्छता, पर्यावरण संतुलन, श्रमदान, गणपती सजावट स्पर्धा, २०२० मध्ये दहीहंडी उत्सवातील बक्षिसाची रक्कम ५१ हजार रुपये पूरग्रस्तांना तर २०२१ मध्ये दहीहंडी उत्सवाची बक्षिसाची रक्कम ३३ हजार रुपये आजारी बालकांना उपचारासाठी मदत निधी, कोकमठाण येथे योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात श्रमदान असे विविध उपक्रम संजीवनी युवा प्रतिष्ठानने आजवर यशस्वीरीत्या राबविले आहेत. कोपरगाव तालुक्यातील युवकांनी उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व्हावे, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, कोपरगाव तालुका विकासाचा रोल मॉडेल ठरावा हा विवेकभैय्या कोल्हे यांचा मानस असून, तालुक्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ते संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. कोपरगाव शहर व तालुक्यात गेल्या आठ वर्षांपासून अनेक नावीन्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रम राबवत संजीवनी युवा प्रतिष्ठानने कोपरगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. युवा, पर्यावरण,कृषी,सामाजिक व आरोग्य या पंचसूत्राच्या सर्वांगांना स्पर्श करीत यशस्वी वाटचाल करणाऱ्या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या कार्याची अनेक मान्यवरांनी दखल घेतली आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.