-संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान
कोपरगाव : युवा, पर्यावरण, कृषी, सामाजिक एकता, आरोग्य या पाच उद्दिष्टांनुसार संजीवनी युवा प्रतिष्ठान गेल्या आठ वर्षांपासून सामाजिक भान जपत नि:स्वार्थीपणे कार्य करत आहे. समाजाला संजीवनी देण्याचे विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले हे कार्य अत्यंत मोलाचे व कौतुकास्पद आहे. आजच्या धकाधकीच्या युगात माणसा-माणसांतील संवाद संपत चालला असून, माणुसकी व संवेदनशीलता लोप पावत आहे. अशा परिस्थितीत संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या ‘जागवूया ज्योत माणुसकीची’ या टॅगलाईनप्रमाणे समाजात माणुसकीची ज्योत पेटवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ‘झी टॉकिज’ फेम सुप्रसिद्ध कवी, युवा व्याख्याते, समाजप्रबोधनकार व कीर्तनकार अविनाश भारती यांनी केले.
विविध सामाजिक उपक्रम राबवून संपूर्ण महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानचा आठवा वर्धापन दिन गुरुवारी (१२ जानेवारी २०२३) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित अविनाश भारती यांचे व्याख्यान, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान, रक्तदान शिबीर आदी कार्यक्रम संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा सेवक विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत कलश लॉन्सच्या सभागृहात आयोजित केले होते. प्रारंभी प्रमुख पाहुणे अविनाश भारती व विवेक कोल्हे यांच्या हस्ते थोर तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ मॉंसाहेब व माजी मंत्री, सहकारमहर्षि स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन व मशाल प्रज्वलित करण्यात आली.
कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान
याप्रसंगी रांगोळीतून श्री साईबाबांचे सर्वात लहान पोर्ट्रेट साकारून विश्वविक्रम प्रस्थापित केलेल्या श्रीमती मसुदा दारूवाला (सामाजिक), वैकुंठ रथचालक अशोक बोऱ्हाडे, गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, वट वृक्ष लागवड करणारे मधुकर लक्ष्मण टेके (साई आनंद ग्रुप, वारी), वृक्षप्रेमी व स्वच्छता दूत सुशांत घोडके (पर्यावरण), ड्रॅगन फ्रूटची शेती करणारे खिर्डी गणेशचे दीपक बाबासाहेब वराडे (कृषी), रोहित काले, जगन्नाथ संजय माळी, रवींद्र आबक (सेंद्रिय गुळ, संवत्सर), रोहित दवंगे (किराणा मॉल), (युवा उद्योजक), आरोग्य सेवक तौसीफ करीम शेख (आरोग्य), मिमिक्री कलाकार संदीप जाधव, भारूड सम्राट भानुदास बैरागी व सहकारी, गोदावरी नदी व डाबरा नाल्यात बुडणाऱ्यांना जीवदान देणारे प्रसाद लक्ष्मीकांत संवत्सरकर, सौरभ जालिंदर संवत्सरकर, सचिन नानासाहेब संवत्सरकर, अतुल शांताराम संवत्सरकर, किरण अशोक सिनगर, काकासाहेब गोरडे, सोमनाथ आहेर (विशेष सन्मान), राष्ट्रीय आंतर विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत कांस्यपदकप्राप्त मयूर रणशिंग, महाराष्ट्र बेसबॉल संघात तीनवेळा निवड झालेली दुर्गा आव्हाड (क्रीडा) यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन रामदास गायकवाड यांनी केले, तर सिद्धार्थ साठे यांनी आभार मानले.
विवेक कोल्हे व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे कार्य दिशादर्शक -अविनाश भारती
व्याख्याते अविनाश भारती यांनी जगदगुरू संत तुकाराम, संत कबीर यांचे अभंग, दोहे व अनेक कवितांचा संदर्भ देत व शब्दांची सुंदर गुंफण करत आपल्या भारदस्त आवाजाने उपस्थितांची मने जिंकली. ओघवत्या शैलीतील आजचे त्यांचे भाषण अत्यंत प्रभावी व प्रेरणादायी ठरले. मी भूमिहीन शेतकऱ्याचा, सालगड्याचा मुलगा व वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. विवेक कोल्हे यांनी आपले आजोबा माजी मंत्री, सहकारमहर्षि स्व. शंकरराव कोल्हे यांच्या पावलावर पाऊल ठेवत सामाजिक कार्यासाठी झोकून घेतले आहे. २०१५ सालापासून त्यांच्या नेतृत्त्वाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठान युवा, पर्यावरण, कृषी, सामाजिक एकता, आरोग्य या पंचसुत्रीनुसार नि:स्वार्थीपणे काम करत आहे. कोरोना महामारीच्या काळात ५०० बेडचे संजीवनी डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ केअर सेंटच्या माध्यमातून कोरोनाग्रस्त रुग्णांन मोफत औषधोपचार, भोजन, ऑक्सिजन सिलिंडरची उपलब्धता, सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा, चिपळूण पूरग्रस्तांना अन्नधान्य, वस्त्र, वैद्यकीय मदत, लोकसहभागातून ११००० वृक्षांचे संरक्षक जाळीसह वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य शिबिरे, मोफत श्रवण यंत्रे व चष्मे वाटप, २४ तास ॲम्ब्युलन्स सुविधा, करिअर मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप, पाणी अडवा, पाणी जिरवा, ग्राम स्वच्छता, पर्यावरण संतुलन, युवकांसाठी रोजगार निर्मिती आदी उल्लेखनीय कार्य संजीवनी युवा प्रतिष्ठानने केले असून, आजही सामाजिक भान जपत हे सेवाकार्य चालू आहे. कृषी, पर्यावरण व आरोग्य क्षेत्रातील प्रतिष्ठानचे कार्य अतिशय मोलाचे व आदर्शवत आहे. विवेकभैय्या कोल्हे हे अभ्यासू व अष्टपैलू युवा नेतृत्त्व असून, त्यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवकांना संघटित करून त्यांना स्वाभिमानाने जगण्याची, निरलस भावनेने समाजसेवा करण्याची दिशा व शक्ती दिली आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानचे कार्य दिशादर्शक असून, मी जिथे कुठे जाईल तिथे विवेकभैय्या कोल्हे व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे नाव आवर्जून घेईन, असे अविनाश भारती यांनी सांगितले.
युवकांनी स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा संकल्प करावा
कोपरगाव ही ऐतिहासिक भूमी असून, धार्मिक, पौराणिक असा मोठा वारसा या भागाला लाभला आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख हे म्हणत असत की, कोपरगावच्या राजकारणावर मला बारीक लक्ष ठेवावे लागते. कारण, कोपरगावातील राजकारणावरूनच महाराष्ट्राचे राजकारण चालते. अशा कोपरगाव तालुक्यात आज विवेक कोल्हे यांचे कर्तृत्व उजळून निघाले आहे, असे सांगून अविनाश भारती म्हणाले, हल्ली तरुण पिढी बिघडत चालली आहे, असा सूर समाजात ऐकावयास मिळतो. त्याला कारणही तसेच आहे. युवकांनी वाममार्गाकडे न वळता चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात. दैववादावर अवलंबून न राहता प्रयत्नवादी बनावे. चांगल्या गोष्टीची सुरुवात उशिरा होते ही जगाची रित आहे. समाजात माझे स्वत:चे वेगळे अस्तित्व आहे आणि जीवनात मला मोठे व्हायचे आहे, असा संकल्प युवकांनी करावा व तो तडीस न्यावा. तीर्थक्षेत्राला जाण्यापेक्षा तुम्ही ज्या गावात राहता तेथे स्वच्छतेची व माणुसकीची ज्योत पेटवून आपल्या भूमीतील लोकांची सेवा करून पुण्य मिळवा. सामाजिक भान जिवंत असेल तर पुण्याचा संचय वाढतो. महाराष्ट्रात पहिल्यांदा कर्जमुक्ती करणारे जगदगुरू संत तुकाराम हे आहेत. त्यांनी दिलेली शिकवण मोलाची आहे. भारतीय संस्कृतीत वय आणि कार्य यांना मोठे स्थान आहे. अनेक जण आपल्या नावासाठी, प्रतिमा जपण्यासाठी धडपडत असतात; पण समाजात स्वच्छ व चांगली प्रतिमा निर्माण करणे वाटते तितके सोपे नाही. जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. ज्याला संघर्ष करता येतो तो कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करू शकतो.
प्रत्येकाच्या हृदयात देव आहे
साने गुरुजींची ‘खरा तो एकची धर्म’ जगाला प्रेम अर्पावे’ ही कविता आणि लोककवी वामनदादा कर्डक यांचे ‘माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे’, याप्रमाणे तरुणांनी माणुसकीचे गीत गावे. तरुणांनी ठरवले तर समाज परिवर्तन होऊ शकते. ‘विश्वास’ या नावाला फार मोठी किंमत आहे. कोंबडीचे अंडे बाहेरून फुटते तेव्हा त्याचे अस्तित्व संपते आणि ते जेव्हा आतून फुटते तेव्हा ते दुसऱ्या एका जीवाला जन्म देत असते हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. तो ओळखला आला पाहिजे. जो समाजाला देण्याचे काम करतो त्याला परमेश्वर काही कमी करत नाही. जीवनात कितीही मोठे व्हा; पण आपली जन्मभूमी, मातृभूमी आणि आपल्या माणसांना कधीही विसरू नका, असा मोलाचा सल्लाही भारती यांनी दिला.
कार्यक्रमास आजी-माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, विविध पक्ष, संस्था, संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक, राजकीय, उद्योग, व्यापार, शिक्षण, कृषी, सहकार आदी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांसह संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबिरात संजीवनी ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी रक्त संकलन केले.
चौकट……..
यावेळी विवेकभैय्या कोल्हे यांनी सर्व युवा सेवकांसमवेत श्रोत्यांमध्ये बसून अविनाश भारती यांचे संपूर्ण व्याख्यान ऐकले. वेगळेपण बाजूला सारत ‘मी नाही तर आपण’ अशी त्यांची ही सर्वसमावेशक कृती उपस्थितांना चांगलीच भावली.