शैक्षणिक गुणवत्तेबरोबर कला गुणांमध्येही संजीवनी आघाडीवर
कोपरगांव: बालेवाडी, पुणे येथे घेण्यात आलेल्या राज्य स्तरीय ब्रास बॅन्ड स्पर्धेत संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या बॅन्ड पथकातील कलाकारांनी आपल्या कलेच्या जोरावर राज्यात अव्वल क्रमांक मिळवुन संजीवनीच्या शिरेपेचात अधिकचा एक मानाचा तुरा खोवला. शैक्षणिक गुणवत्तेबरोबर संजीवनी सर्वच क्षेत्रात आघाडीवर असते, हे संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी अधोरेखित केले आहे, अशी माहिती संजीवनीच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
सदरच्या राज्य स्तरीय स्पर्धा शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद , मुंबई आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आल्या होत्या. आयोजकांनी प्रथम राज्यातील इच्छुक शिक्षण संस्थांकडून बॅन्ड पथकांच्या ध्वनीचित्र फित मागविल्या होत्या. यात ८५ संस्थांनी सहभाग नोंदविला. यातुन फक्त १२ संघांनाच प्रत्यक्ष सादरीकरणासाठी बोलविण्यात आले होते. यात संजीवनीच्या कलाकारांनी अतिशय शिस्तध्द व तालबध्द सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
उपस्थितांमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे श्री राहुल रेखावार (भा. प्र.से.), याच संस्थेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालीका डॉ. माधुरी सावरकर, उपविभाग प्रमुख सचिन चव्हाण, गायिका व शिक्षिका श्रीमती पद्मजा लामरूड, आदींचा समावेश होता. यांच्याच हस्ते ३० कलाकारांच्या ब्रास बॅन्ड पथकाचा कॅप्टन विपुल वाघ व संगीत प्रशिक्षक महेश गुरव यांनी विजयी ट्रॉफी व प्रमाणपत्र स्वीकारले. या स्पर्धा पाहण्यासाठी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे आवर्जुन उपस्थित होते. ३० कलांकारांच्या पथकाला संगीत शिक्षक महेश गुरव व श्री देवांग मक्वाना यांनी संगीताचे मार्गदर्शन केले तर वसतिगृह अधिक्षक विजय भास्कर यांनी विद्यार्थ्यांना संचलनाचे मार्गदर्शन केले तसेच श्री उमेश उशिर यांचेही मार्गदर्शन लाभले.
संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये दैनंदिन शैक्षणिक बाबींसह वत्कृत्व कला, वादविवाद, खेळ, संगीत, अशाही बाबी शिकवुन बहुआयामी विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. संगीत शिकविण्यासाठी संस्थेने ट्रम्पेट, इफोनिअम, बॅरॅटॉन, बेसड्रम, साईड ड्रम, अशा सर्व प्रकारचे साहित्य घेतले असुन शास्त्रिय पध्दतीने शिक्षण दिल्या जाते. आता संजीवनीचे हे ब्रास बॅन्ड पथक विभागीय स्पर्धेसाठी मध्यप्रदेश येथे नोव्हेंबर मध्ये जाणार आहे. यात मध्यप्रदेश , गोवा, दादरा नगर हवेली व महाराष्ट्राच्या विजयी संघांचा समावेश असणार आहे. तेथेही जिंकायचेच, या जिध्दिने सर्व कलाकार सराव करीत आहे.
संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व विजयी कलाकारांचे अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे. तसेच प्राचार्य कैलास दरेकर व सर्व मार्गदर्शकांचेही अभिनंदन केले आहे.