संत महिपती महाराज दिंडी पंढरीच्या दिशेने विठुरायाच्या भेटीला मार्गस्थ

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

         ज्येष्ठ महिन्याची सांगता, आषाढ महिन्याची आगमनता ह्या पर्वणीला रखरखत्या उन्हात ‘टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि  श्री संत कवी महिपती महाराजांच्या जयजयकारात’ प्रतिपंढरपूर असलेल्या श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील भक्तीनेभावाने भरलेला संत महिपती महाराजांचा पायी दिंडी सोहळा काल विधीवत पूजनानंतर पंढरीच्या दिशेने विठुरायाच्या भेटीला मार्गस्थ झाला!

     श्रीक्षेत्र ताहाराबादला महिपती महाराजांच्या समाधी मंदिराच्या प्रांगणात दिंडीचा पहिला रिंगण सोहळा पार पडला. अश्वांचे टाळ मृदंगाच्या ठेक्यात आणि ज्ञानोबा-तुकारामांच्या गजरात पडलेले पदन्यास, शाळकरी मुलांची पावली, फटाक्यांची आतषबाजी, सनई चौघड्यांचा सूर, नानाविध फुलांची उधळण या भारावून टाकणाऱ्या वातावरणात भव्य पताका धारण केलेल्या वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने निघाली. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी व वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी श्रीक्षेत्र ताहाराबादला महिपती महाराजांच्या समाधी मंदिराच्या प्रांगणात भाविकांची मांदियाळी जमा झाली होती.

       काल गुरुवार (दि.१५) सकाळी १० वाजता दिंडीचे प्रस्थान झाले. प्रारंभी स्वयंभू विठ्ठल -रुक्मिणीच्या मंदिरात धनश्रीताई विखे यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. संत महिपती मंदिर ते कालभैरव मंदिरापर्यंत अश्व व विद्यार्थ्यांच्या पावलीने दिंडीचे आकर्षण वाढविले. यावेळी महिपती महाराजांचे वंशज दत्तगुरु यांनी मंत्रोपचारात पालखीचे पूजन करून आरती केली. देवस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त बाबासाहेब वाळुंज यांनी पायी दिंडी सोहळ्याची आख्यायिका सांगून वारीचे महत्त्व सांगितले. तसेच देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे यांनी पायी दिंडी सोहळ्याची नियमावली विशद करून सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. धनश्रीताई विखे यांनी वारकऱ्यांना शुभेच्छा देऊन, देवस्थानसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संत महिपती देवस्थान क वर्गात असल्यामुळे शासनाचा निधी कमी मिळतो. त्यामुळे देवस्थानचा सर्वांगीण विकास होण्यासाठी देवस्थान क वर्गातून ब वर्गात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन धनश्रीताई विखे यांनी दिले.

      पायी दिंडी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर वारकऱ्यांच्या मनामध्ये एकच विचारधारा असते,

       पंढरीच्या वाटे । चाललीसे वारी।।

नामाच्या गजरी । अखंडित।।

विसरून गेले । सारे देहभान।।

तुझे गुणगान । ओठावरी।।

तुझिया नामाचा । एकमात्र छंद।।

देवा हा आनंद । नाही कोठे।।

तुझ्या भेटीसाठी । जीव कासावीस।।

अन्य नाही आस । पांडुरंगा।।

जन्मोजन्मी आहे । तुझा मी साधक।।

होऊ दे सार्थक । जन्माचे या।।

आई आणि मुलाचा जिव्हाळ्याचा संबंध असतो, तसाच वारकरी आणि पांडुरंग यांचा संबंध असतो…

       योगिनी एकादशीनिमित्त राहुरी येथील प्रगतशील शेतकरी पंकज भुजाडी यांच्या परिवाराच्यावतीने महाअभिषेक करण्यात आला. एकादशीनिमित्त दुपारी नाना महाराज गागरे यांचे प्रवचन झाले. तसेच ताहाराबादचे भूमिपुत्र, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे स्वीय सहाय्यक गंगाराम मुंढे यांनी वारकऱ्यांची फराळाची व्यवस्था केली केली.  रात्री संजय महाराज शेटे, कणगर यांचे कीर्तन झाले. तर बाळकृष्ण महाराज कांबळे यांनी फराळाची व्यवस्था केली होती.

       प्रास्तविक पत्रकार शिवाजी झावरे यांनी केले. मान्यवरांच्या शुभेच्छानंतर विधीवत पूजन आणि आरतीनंतर हा सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे, उपाध्यक्ष अविनाश कांबळे, ज्येष्ठ विश्वस्त आसाराम ढूस, ताहाराबादचे लोकनियुक्त सरपंच निवृत्ती घनदाट, ताहाराबाद सेवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र झावरे,कामगार पोलीस पाटील किरण उदावंत,माजी सरपंच नारायण झावरे, सिताराम झावरे, शरद किनकर, शिवाजी कपाळे, दिलीप जगताप, देवस्थान समिती, पायी दिंडी सोहळा समिती,विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षकवृंद ,ताहाराबाद पंचक्रोशीतील शुभेच्छा देण्यासाठी भाविंक उपस्थित होते. टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष करीत वारकरी पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here