सत्ताधाऱ्यांनाही EVM वर संशय;राम शिंदेनी फेरमतमोजणीसाठी भरले पैसे

0

 कर्जत,जामखेड : विधानसभा निवडणुकीचा अनाकलनीय निकाल लागला. अनेक ठिकाणी झालेले मतदान आणि मिळालेली मते यामध्ये तफावत असल्याचे दिसले. तर काही ठिकाणी विजयी आणि पराभूत उमेदवारांना सारखीच मते मिळाल्याचे दिसून आले.
विरोधकांनी याविरोधात रान उठवले असून महाविकास आघाडीने ईव्हीएमविरोधात मोहीमही हाती घेतली आहे. विशेष म्हणजे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला असून माजी मंत्र्याने फेरमतमोजणीसाठी पैसे भरले आहेत.

विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघामध्ये ‘कांटे की टक्कर’ पहायला मिळाली. अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला, तर काहींनी अवघ्या काही मतांनी आपला किल्ला राखला. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांचाही समावेश असून कर्जत-जामखेड मतदारसंघातून त्यांनी अवघ्या 1243 मतांनी विजय मिळवत भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव केला.
        

राम शिंदे यांनी पराभवानंतर अजित पवार गटावर हल्ला चढवला होता. तसेच ईव्हीएमची फेरमतमोजणी करण्यासाठी त्यांनी 8 लाख 2 हजार 400 रुपये भरले आहेत. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील 17 बूथवरील ईव्हीएमची मते आणि व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या यांच्या पडताळणीची मागणी राम शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे विरोधकांनंतर आता सत्ताधाऱ्यांचाही ईव्हीएमवर विश्वास नसल्याचे दिसले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरीतील पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे, कोपरगाव मतदारसंघातील संदीप वर्पे आणि पारनेर मतदारसंघातील राणी लंके यांनीही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धराम सालिमठ यांच्याकडे अनामत रक्कम भरून ईव्हीएम तपासणीसाठी अर्ज केले आहेत.
उरणमध्ये ईव्हीएमचा झोल; मतदानापेक्षा मोजणीत जास्तीची मते आली कुठून? फेरमोजणीसाठी मनोहर भोईर यांची मागणी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here