सफाई कामगारास मारहाण प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

                 राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याची घटना घडत नाही, तोच उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सावळ्या गोंधळाने आरोग्य विभागात एकच खळबळ उडवून दिली. उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सफाई कामगाराच्या मोबाईलमधील संकलित माहिती नष्ट करण्यासाठी शर्ट फाडून मारहाण करत मोबाईल हिसकावून माहिती नष्ट केल्याची घटना घडली. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

              राहुरी तालुक्यातील उंबरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राजेश भाऊराव नगरे (वय ३४, रा. दरेवाडी करांडेमळा ता. जि. नगर) हा सफाई कामगार म्हणून अनेक दिवसांपासून कार्यरत आहेत. वैद्यकीय अधिकारी व सफाई कामगार यांच्यामध्ये असलेली धुसफूस अनेक दिवसांपासून सुरू होती. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी अविनाश वसंतराव जाधव, संजय सुरज कपूर, प्रगती साळवे, चित्रा ढोकणे (सर्व रा. प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरे) यांनी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकच गोंधळ घातला. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी नगरे यांला वैद्यकीय अधिकारी यांच्या कॅबिनमध्ये अधिकाऱ्यांसह बोलावून घेतले. मोबाईल ताब्यात घेत पासवर्डची मागणी करीत नगरे यांना मारहाण करत शर्ट फाडला. नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत साळवे यांनी मोबाईल हिसकावून घेत तो ढोकणे यांच्याकडे दिला. ढोकणे यांनी मोबाईलमधील सर्व माहिती नष्ट केल्यानंतर तो नगरे परत यांच्याकडे दिला. यानंतर चौघांनी तक्रारदार नगरे यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये कोंडून घेतल्याचा गुन्हा राहुरी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.

            दरम्यान, या प्रकरामुळे उंबरे आरोग्य केंद्रातील प्राथमिक अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील असमन्वय उघडकीस आला आहे. बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकारी विभागातील एका वैद्यकीय महिला अधिकारी यांच्याकडून थकीत वेतन रक्कम देण्यासाठी 10 हजाराची लाच घेताना चतुर्भुज झाल्याची घटना एकीकडे घडत असताना दुसरीकडे उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून एका सफाई कामगाराला बेदम मारहाण व मोबाईल मधील माहिती नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आल्याने आरोग्य विभागातील सावळा गोंधळ उघडकीस आला आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सफाई कामगारास मारहाण होण्याचा पहिलाच प्रकार उंबरे परिसरात झाल्याचे सूत्रांनी सांगितले. उंबरे प्रकरणाबाबत गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी दिली आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाले आहेत.

….त्या मोबाईलमध्ये…. दडले काय?

             मोबाईलमध्ये संकलित असलेल्या माहितीवरूनच उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्रात राडा झाल्याची चर्चा आहे. मोबाईलमध्ये नेमके काय दडले होते? मोबाईल मधील माहिती नष्ट करणे किंवा रुग्णवाहिकेखाली मोबाईल नष्ट करण्याचा प्रकार झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्या मोबाईलमध्ये नेमके दडले होते काय? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.दाखल गुन्ह्यातील तीघांपैकी कोणाचे दुष्यक्रम कोणाचे होते,याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here