पुणे : समता पतसंस्था ही महाराष्ट्रातील अशी पतसंस्था आहे की, या पतसंस्थेने ज्येष्ठ नागरिकांचे उर्वरित आयुष्य आनंदी व सुखाने कसे जगावे यासाठी व्याख्यानाचे आयोजन करून आमचे स्वागतापासून पासून ते कार्यक्रमाच्या समारोपापर्यंत काळजी घेतली. त्यामुळे समताचे हे कार्य सामाजिक क्षेत्रात देखील महत्त्वपूर्ण असून प्रशंसनीय आहे.समता पतसंस्थेने असा उपक्रम घेऊन एक आदर्श निर्माण केला. या दोन तासाच्या व्याख्यानामध्ये आम्ही कधीही आयुष्यात एवढे हसलो नाही, तेवढे समता पतसंस्थेने घेतलेल्या या व्याख्यानाच्या अनुषंगाने आम्हाला हसायला मिळाले. काकांनी आम्हाला या अनुषंगाने नुसते हसवले च नाही तर व्यायाम करत नाचवले ही त्यामुळे समताच्या सेवा भावाने आम्ही सुखावलो आहोत.असे प्रतिपादन समता पतसंस्थेच्या पुणे शाखेतील ज्येष्ठ नागरिक सुभाष राजवळ यांनी केले.
समता पतसंस्थेच्या पुणे शाखेच्या वतीने जेष्ठ नागरिकांसाठी ‘आनंदी जीवन कसे जगावे या विषयावर सुप्रसिध्द व्याख्याते अशोक देशमुख यांचे व्याख्यान गुरुवार दि. ०५ जानेवारी २०२३ रोजी पुणे शहरातील डेक्कन जिमखाना भागातील अथर्व हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते.त्या प्रसंगी ते बोलत होते.
तसेच ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करताना व्याख्याते अशोक देशमुख म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे त्या संपत्तीचे जतन करणे त्या कुटुंबातील प्रत्येकाची जबाबदारी असून प्रथम कर्तव्य आहे.ज्येष्ठ नागरिकांनी ही आपल्या कुटुंबासोबत आपले उर्वरित आयुष्य आनंदाने, सुखाने जगता यावे यासाठी बोलणे, चालणे, हसणे, दानधर्म करणे, दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होणे, माफ करणे, योगसाधना करणे, कोणताही विचार न करता पूर्ण झोप घेणे यांसारख्या सात सवयी अंगिकारल्या तर निश्चितच प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचे आयुष्य हे आनंदात आणि सुखात जाईल.
प्रसंगी समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे म्हणाले की, जेष्ठ नागरिकांचा सन्मान करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे.याच कर्तव्य भावनेने समता पतसंस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष फायदेशीर योजना अंमलात आणल्या असून समता त्यांच्या ठेवीवर अर्धा टक्का व्याज अधिक देणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यभर केलेली बचत किंवा सेवानिवृत्ती प्रसंगी मिळालेली रक्कम गुंतवणूक करून त्यावर मिळणाऱ्या व्याजातून ज्येष्ठ नागरिकांना समता मोठा हातभार लावत असते.तसेच वयोमानानुसार त्यांचे उर्वरित आयुष्य आनंदाने जगता यावे आणि उतरत्या वयानुसार आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची व त्यावर वेगवेगळे उपचार कसे करावे यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन समताने केले होते.
तसेच ज्येष्ठ अर्थतज्ञ अनिल बोकील व विजय दबडगावकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्तरावरील अर्थक्रांती या संघटनेच्या वतीने भारतातील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा १० हजार निवृत्ती वेतन मिळावे, शासकीय कार्यालयात सन्मानाची वागणूक मिळावी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ॲट्रॉसिटी सारखा कायदा तयार करावा आणि ज्येष्ठ नागरिकांना एक राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्यात यावे.या मागण्या मंजूर करण्यात याव्यात यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मोहीम देशभर चालू आहे.
उपस्थित जेष्ठ नागरिकांपैकी शेख जी.जी. मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सरकारी नोकरी करत असताना सदैव आमच्यावर कामाचा ताण आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असायचा, पण आज पुढील उर्वरित आनंदी जीवन कसे जगाचे हे समता पतसंस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या व्याख्यानामुळे शिकलो आणि आम्ही सर्वांनी टाळ्या, हशा, शिट्ट्या तसेच नृत्य करत व्याख्यानाचा आस्वाद घेत आनंद घेतला.
समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, जेष्ठ सभासद श्रीनिवास पिंपळवाडकर, ईश्वर आंधळकर , रमेश आंधळकर, दिलीप देशमुख, सुभाष राजवळ, जी.जी.शेख, दिलीप साखरे, रत्नाकर म्हाळगी, कैलास गंगवाल आदींसह विविध क्षेत्रातील जेष्ठ सभासद उपस्थित होते.जनरल मॅनेजर .सचिन भट्टड, मुख्य कार्यालयाचे अधिकारी यांची ही उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्य कार्यालयाचे अधिकारी,पुणे शाखेचे शाखाधिकारी राजेश महाजन, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, उपस्थितांचे आभार संस्थेचे ठेव विभाग प्रमुख संजय पारखे यांनी मानले.