नगर – मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतीगृह व रमाई घरकुल योजनांमध्ये प्रशासनाकडूने झालेल्या अन्यायकारक दिरंगाईच्या निषेधार्थ कर्जत तालुका राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल क्षीरसागर व भिमशक्तीचे जिल्हा संघटक अनिल समुद्र यांनी नगरच्या समाज कल्याण कार्यालयासमोर सुरु केलेले उपोषण सहाय्यक समाज कल्याण आयुक्त राधाकिसन देवढे यांच्या लेखी पत्र दिल्यानंतर मागे घेण्यात आले.
कर्जत तालुक्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल क्षीरसागर यांना शासनाने मंजुर केलेले घरकुल देण्यात कर्जत नगरपंचायतीने अन्यायकारक व बेकायदेशीर एकतर्फी निर्णय घेत दप्तर दिरंगाई केली. त्याच्या निषेधार्थ नगरच्या समाज कल्याण कार्यालयासमोर कुटूंबासह उपोषण सुरु केले होते. या उपोषणात भिमशक्ती संघटनेच्यावतीने सहभाग घेऊन क्षीरसागर कुटूंबाला न्याय मिळण्यासाठी तसेच मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतीगृह प्रवेशाच्या याद्या जाहीर कराव्यात, सर्व तालुक्यातील रमाई घरकुल योजनेतील सन 2020 ते 2023 वर्षातील गावनमुना 8 अ च्या उतार्यावर मंजुर करुन सुरु करण्यात यावा आदिं मागण्यासाठी उपोषणात सहभाग घेतला होता.
दोन दिवस सुरु असलेल्या या उपोषणाची दखल समाज कल्याण कार्यालयाने घेऊन आयुक्त राधाकिसन देवढे यांनी तातडीने कर्जत नगर पंचायतचे मुख्याधिकारी श्री.साबळे यांच्यासमवेत बैठक घेऊन वरील उपोषणकर्त्यांच्या मागण्या करुन जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत खांडकेकर यांनी लेखी पत्र दिले. यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
या उपोषणामध्ये सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत डोलारे, आशा क्षीरसागर, भिमशक्तीचे तालुकाध्यक्ष विलास कांबळे, राम दोडके, प्रल्हाद शिंदे, जी.बी.कांबळे, सुहास कांबळे, रमेश व्हरकटे, दादासाहेब शिंदे आदि सहभागी झाले होते.