मुंबई, दि. १५ : शिशुवर्गापासूनच मुलांचा बौद्धिक आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी लवकरच राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ शिशुवर्गाचे (सिनियर केजी, ज्युनियर केजी) शिक्षण दिले जाणार आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर (पश्चिम) येथील सखाराम तरे मुंबई पब्लिक स्कूल इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते झाले.
या सोहळ्याला स्थानिक आमदार मनीषा चौधरी, आमदार प्रकाश सुर्वे, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आदी मान्यवरांसह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले, “आज शाळेचा पहिलाच दिवस आणि आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह शाळेच्या नवीन वास्तूत शिक्षण घेता येणार आहे. या गोष्टीचा मनस्वी आनंद होत आहे. यंदाच्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यात आले आहे. त्यांना वह्या मोफत दिल्या असल्या तरीही त्या शाळेत न आणता त्यांचा घरीच अभ्यास करायचा आहे. दररोज शाळेत येताना सर्व विषय एकत्र असलेले एकच पुस्तक आणायचे आहे. याच पुस्तकात धडा संपल्यानंतर वह्यांची कोरी पाने जोडण्यात आली आहेत. त्यामुळे धडा समजून घेतल्यानंतर त्या विषयाचे महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थी लिहू शकतील. अशा प्रकारची चार पुस्तके वर्षभरासाठी देण्यात आली आहेत”, असे त्यांनी नमूद केले. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये लवकरच रोबोटिक, विज्ञान आणि भाषा विषयासंदर्भातील प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई महानगरात ज्या-ज्या ठिकाणी शाळांची गरज असेल त्यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रस्ताव तयार करावा, त्याला मंजुरी देण्यात येईल, असेही श्री. केसरकर यांनी सांगितले. दहिसर परिसरात सातवीपर्यंत असलेल्या शाळा लवकरच आठवी ते दहावीपर्यंत सुरू करण्यात येतील, असे श्री. केसरकर यांनी सांगताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.