सोमैया महाविद्यालयात ‘सायबर सुरक्षा’ वर व्याख्यान
कोपरगाव प्रतिनिधी :
“सायबर सुरक्षा म्हणजे संगणक प्रणाली, नेटवर्क, डेटा आणि माहिती तंत्रज्ञानाचे संरक्षण करणे होय. सद्यस्थितीमध्ये सायबर सुरक्षा ही तरुण पिढीसाठी आणि विशेषत: महिलांसाठी खूपच आवश्यक आहे. कारण सायबर गुन्ह्यांमध्ये महिलांना प्राधान्याने असुरक्षितता जाणवते. परिणामी सायबर सुरक्षा वाढविण्यासाठी महिलांनी आपल्या माहितीची काळजी घेणे, त्यासाठी मजबूत पासवर्ड वापरणे आणि संशयास्पद लिंक्स किंवा ई-मेल टाळणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन प्रा. विपुल ब्राह्मणे यांनी येथे केले. स्थानिक के जे सोमैया महाविद्यालयांमध्ये अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीच्या विद्यमाने ‘सायबर सुरक्षा’ विषयावर आयोजित विशेष व्याख्यानसत्रात प्रा. ब्राह्मणे बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे गणित विभाग प्रमुख डॉ. बी. डी. गव्हाणे होते.
यावेळी प्रा. ब्राह्मणे यांनी रॅन्समवेअर, वॉर, व्हायरस, फ्रोजन यासारख्या टर्म आणि हानिकारक सॉफ्टवेअर इ. संदर्भात विशेष टिप्स दिल्यात. त्याचबरोबर फिशिंग, डेटा उल्लंघन, रँसमवेअर, फायरवॉल, अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आदी टर्म्स संदर्भातही अभ्यासपूर्ण विवेचन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. गव्हाणे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींशी बोलताना किंवा सोबत वावरताना खबरदारी घेतली पाहिजे. नियमित अभ्यासासोबत आपल्याला महिलांसंदर्भातील कायद्यांविषयी माहिती असणे देखील आवश्यक आहे. महाविद्यालयात वावरताना आपले वर्तन सभ्य असावे. शिस्त आणि नियमांबरोबरच सभ्यता आणि संस्कार देखील तितकेच मोलाचे आहेत.”
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाच्या प्रारंभी अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती प्रमुख डॉ. सुरेखा भिंगारदिवे यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. समिती सदस्य डॉ. नीता शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले, तर प्रा. मयुरी आहेर यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. या व्याख्यानसत्रात वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद तसेच बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी स्वयंस्फूर्तीने उपस्थित होते. प्रा. वर्षा आहेर, प्रा. निकिता नन्नवरे, प्रा. नेहा घोडके आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम केले.