राज्य कृषि पदवीर संघटनेच्या पाठपुराव्यास यश – महेश कडूस
नगर – राज्य कृषि पदवीधर संघटनाच्या उद्योगभारती विभाग व दक्षिण नगरमधील भाऊसाहेब कडूस पाटील प्रतिष्ठान, सारोळा कासार यांच्यावतीने नगर तालुका कृषि विभागाकडे काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या मागणी नुसार नगर तालुका कृषि विभागाच्या आत्मा यंत्रणेकडून शेतकर्यांसाठी राजस्थान व पंजाब असा आंतरराज्य कृषि अभ्यास दौरा मंजूर करण्यात आला आहे. उद्योगभारती विभागाच्या वतीने ईस्त्राईल कृषि अभ्यास दौरा, सिक्कीम सेंद्रिय शेती कृषि अभ्यास दौरा असे दौरे गेल्या दशकापासून खाजगी तत्वावर नेहमी आयोजित केले जातात.
नुकताच संघटनेला सारोळा कासार करिता नगर तालुका पातळीवर शासकीय कृषि अभ्यास दौरा आत्मा विभागा कडून तालुक्यातील कृती आराखड्यात मागणी नुसार मंजूर करण्यात आला आहे. राज्य कृषि विभागाच्या आत्मा यंत्रणे मार्फत या दौर्याला व यंत्रणेच्या कृती आराखड्याला अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. यामुळे सारोळा कासार मधील शेतकर्यांना आता इतर राज्यांच्या प्रगतीशील शेतकरी यांच्या शी संवाद साधता येणार असून, राजस्थान व पंजाब मधील शेती आधारित नवे उद्योग पाहता येणार आहेत.
सदर पंजाब व राजस्थान दौरा डिसेंबर 2023 मधे जाणार असून या दौर्यात इच्छुक प्रगतीशील शेतकरी यांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन भाऊसाहेब कडूस पाटील प्रतिष्ठानचे सचिव श्री चेतन साळवे यांनी केले आहे. प्रथम नाव नोंदणी करणार्यांस प्राधान्य असून, हा दौरा खाजगी नसून या दौर्यात शासनाच्या नियम अटी लागू आहेत. तसेच सारोळा कासार व पंचक्रोशी मधील च शेतकर्यांना यात सहभाग घेता येईल, अधिक माहितीसाठी चेतन साळवे (मो.8857938703) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.
राजस्थान मधील श्री गंगानगर येथे किन्नू व संत्राची शेती मोठया प्रमाणावर केली जाते, पंजाबमधे दूध उत्पादक शेतकरी चांगले प्रयोग करीत आहेत. त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये दौरा आयोजित करण्याची आमची मागणी सारोळा कासारच्या व पंचक्रोशी मधील स्थानिक शेतकर्यांना ज्ञान मिळण्यासाठी होती ती आता मंजूर झाली असून, लवकरच या दौर्याचा सविस्तर कार्यक्रम जाहीर होईल, असे शेतकरी पदवीधर नेते महेश कडूस पाटील यांनी सांगितले.
नगर तालुका आत्माचे समन्वयक श्री.जावळे साहेब यांनी मागणी पत्रानंतर योग्य दिशेने प्रयत्न करून शेतकर्यांना लाभ मिळवून दिला असून त्यांचे आभार संघटना संचालक मनोज कडूस पाटील यांनी मानले. आत्मा व कृषि विभागात अनेक चांगल्या योजना असून या पुढे त्या गाव व तालुका पातळीवर विभागाच्या वतीने संघटना व प्रतिष्ठान राबवणार असल्याचे श्रीमती मंगल कडूस पाटील यांनी सांगितले आहे.