जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड तालुक्यात दि. ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन साजरा होत आहे सावित्रीबाई यांनी एकल/विधवा भगिनींना आधार देण्याचे महत्वपूर्ण काम केले होते तो वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी जामखेड तालुक्यातील सर्व गावातील एकल महिलांची विधवा, घटस्फोटित व परित्यक्ता विशेष सभा ग्रामपंचायतमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
अमृत पंधरवडा या उपक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या आदेशाने एकल महिलांची नोंदणी केली आहे. काही महिलांची नोंदणी राहिली असेल तर ३ जानेवारी पूर्वी करण्यात येणार आहे.
३ जानेवारीच्या बैठकीत सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती सांगण्यात येईल. या एकल महिलांना कोणकोणत्या शासकीय योजना मिळतात ? त्याचा आढावा सदर बैठकीत घेतला जाईल.
संजय गांधी निराधार योजना, या महिलांच्या १८ वर्षाखालील मुलांसाठी बालसंगोपन योजना, बचत गट सहभाग, रेशनकार्ड आहे का, बँकेत जनधन खाते, रोजगारासाठी या महिला काय करू इच्छितात, शेतीत काय मदत (सिंचन विहीर/फळबाग/गायगोठा/शेळीपालन शेड) हवी आहे, वारस नोंदी केल्या आहेत का मालमत्ता विषयक अडचणी काय आहेत, पुढे शिक्षण पूर्ण करावेसे वाटते का व त्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व मुक्त शाळा उपक्रमाची माहिती देणे या बैठकीला गावातील महिला कार्यकर्त्या, बचतगट, महिलामंडळ अध्यक्ष शिक्षीता, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे
एकल व निराधार महिलांना मदतीचा हात देऊन त्यांना सक्षम करण्याचा उद्देश यामागे आहे. सर्व मुद्द्यांवर सविस्तर माहिती घेऊन एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी पंचायत समिती जामखेडच्या वतीने कृती कार्यक्रम आखला जाणार आहे. सर्व एकल महिलांनी तात्काळ ग्रामसेवकांकडे आपली नोंदणी करून घ्यावी
प्रकाश पोळ – गटविकास अधिकारी पंचायत समिती जामखेड