नगर – कुठलीही खाजगी शिकवणी लावलेली नसतांना स्वत:च्या कष्टावर व आत्मविश्वासामुळे सिद्धेश तागड या ग्रामीण भागातील युवकाने युपीएससी परिक्षेत मिळविलेले यश तरुणांना प्रेरणादायी असेच आहे. आज स्पर्धा परिक्षांची तरुण मोठ्या प्रमाणात तयारी करत आहेत. परंतु जिद्द, चिकाटी आणि मेहनत जो करतो त्यालाय यश प्राप्त होत असते. सिद्धेश याने मिळविलेल्या यशात त्यांची मेहनत दिसून येते. पुढील काळात त्याने स्पर्धा परिक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. अशा विद्यार्थ्यांसाठी आपण सर्वोतोपरि सहकार्य करु, असे प्रतिपादन माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे यांनी केले.
शहरातील तागडवस्ती येथील सिद्धेश तागड यांची यु.पी.एस.सी परिक्षेत 809 गुण मिळवत आय.ए.एस पदासाठी निवड झाल्याबद्दल आ.राम शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे राज्य सरचिटणीस सोमनाथ बाचकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वधू-वर सूचक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र तागड, निशांत दातीर, प्रा.अरुण राशीनकर, प्रा.लक्ष्मण तागड, सौ.जयश्री तागड आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
सिद्धेश तागड यांचे कुटुंबीय शेवगाव तालुक्यातील एरंडगांव मधील तागड कुटूंबिय शहरात नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाले. सिद्धेशने सीओपी महाविद्यालय, पुणे येथे मॅकेनिकल इंजिनिअर शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धा परिक्षेत भविष्य घडविण्याचा निर्णय घेतला. व आज त्याची ध्येयपुर्ती झाली आहे. यावेळी प्रा.अरुण राशिनकर यांनी विस्तृत माहिती दिली तर सोमनाथ बाचकर यांनी आभार मानले.