संगमनेर : संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ उकीडेॅ यांना आदर्श गाव राळेगणसिद्धी येथे नगर-पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यक्षम आमदार निलेश लंके यांच्या हस्ते मानाचा समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथे जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त मानवाधिकार फाउंडेशनचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात दिनदर्शिका प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. ध्यानतज्ञ व समुपदेशक डॉ.दीपेश पष्टे संचलित आपले मानवाधिकार फाउंडेशन ही राष्ट्रीय संस्था कार्याच्या बळावर संपूर्ण भारत देशात आपले नाव कानाकोपऱ्यात पोहोचवत आहे. सामाजिक, सांस्कृतिक, मानवहित जपणारी, समाजसेवा करणारी तसेच भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवणारी, संविधान जनजागृती करणारी एकमेव संस्था आहे. डॉ.दीपेश पष्टे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनात संविधानाचे महत्त्व व समाजकार्याची भावना रुजवली आहे. संविधानाच्या माध्यमातून या संस्थेचा मोठा वटवृक्ष बनत चाललेला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष शंकर आप्पा जाधव होते. यावेळी नगर-पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यक्षम आमदार निलेश लंके यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ उकीॅडे यांना संविधान पत्र व गौरव चिन्ह देऊन समाज रत्न पुरस्कार बहाल करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले की आपले मानवाधिकार फाउंडेशन खऱ्या अर्थाने समाजसेवा करत आहे. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढत आहे. तळागाळातील खेडोपाड्यात जाऊन समाज कार्य करणाऱ्या व्यक्तींचे कार्य बघून अशा समाजसेवकांना पुरस्कार देऊन त्यांना समाजकार्य करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन देत आहे. आपले मानवाधिकार जनता दरबार, आरोग्य शिबिर, संविधान जनजागृती, अंधश्रद्धा मुक्त अभियान असे विविध प्रकारचे उपक्रम या संस्थेने जिल्हाभरात घ्यावे यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करू असेही आमदार निलेश लंके यांनी यावेळी सांगितले. यावेळी संस्थेच्या सचिव रेणुकाताई दिघे, संगमनेर तालुकाध्यक्ष लहू सातपुते आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ उकीडेॅ यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात,आमदार डॉ.सुधीर तांबे, इंद्रजीत थोरात, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, सत्यजित तांबे, रणजितसिंह देशमुख आदींसह सर्व स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.