संगमनेर : बोगस बियाणे, कीटकनाशके यावर कृषी विभागाने अधिकाधिक देखरेख करून बियाणे व खतांच्या वापराबाबत बांधावर जाऊन माहिती द्या. तसेच सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत शेतकरी ते ग्राहक नाते निर्माण करून सेंद्रिय शेती पिकांच्या विक्री साठी नियोजन करा. सर्व शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेत उपलब्ध करून द्या अशा सूचना काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी महसूल व कृषिमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर उपविभागीय कार्यालयात खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरूळे, माजी सभापती सौ.सुनंदाताई जोर्वेकर, माजी उपसभापती नवनाथ अरगडे, जि.प.सदस्य अजय फटांगरे, सौ.मिराताई शेटे, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, जिल्हा बॅकेचे संचालक गणपतराव सांगळे, पंचायत समिती सदस्य किरण मिंडे, विष्णुपंत रहाटळ,बी.आर.चकोर, सुभाष सांगळे, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद कुलाळ, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, गटविकास अधिकारी अनिल नागणे,प्रभारी.तहसीलदार गणेश तळेकर, शितल घावटे, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, डॉ. सुरेश घोलप आदिंसह सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून तालुक्यातील शेतकऱ्यांना मृदाआरोग्य पत्रिकेनुसार खतांचे प्रशिक्षण द्या. कृषी विभागाने बोगस बियाणे व बोगस कीटकनाशके यावर देखरेख ठेवताना सर्व शेतकऱ्यांना वेळेत खते व बियाणे उपलब्ध होतील यासाठी नियोजन करा. संगमनेर तालुक्यात सोयाबीन उत्पादन वाढत असून या पिकाच्या बियाणाबाबत अडचण निर्माण होत असते. काही बियाणांमध्ये उगवण क्षमतेचा प्रश्न निर्माण झाले असून याबाबत वेळीच काळजी घ्या. तसेच शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी उंबरठा योजनेबाबत माहिती सांगा. सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून सेंद्रिय उत्पादित मालांना मोठी बाजारपेठ आहे. म्हणून शेतकरी ते ग्राहक असे नाते निर्माण करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन मिळवता येईल.
त्याचबरोबर संगमनेर तालुक्यात ऊस उत्पादन जास्त असून पाचटकुट्टी बाबत अधिक प्रशिक्षण देऊन याचे महत्त्वही शेतकऱ्यांना समजावले पाहिजे. आपण राज्याचे कृषिमंत्री पद सहा वर्षे सांभाळले असून या काळात खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक ही विभागनिहाय होत होती. यामध्ये स्वतः मुख्यमंत्री उपस्थित राहायचे. परंतु सध्या अशा बैठका विभागीय पातळीवर होत नाही. मात्र या बैठकांमधून पुढील वर्षाचे शेती उत्पादनाचे नियोजन करणे सोयीस्कर होत असते. यावर्षी अललिनोच्या प्रभावामुळे उशिरा येणारा पाऊस आणि कमी पाऊस या बाबी लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्क राहिले पाहिजे. नवीन वाण व सेंद्रिय शेती याबाबत शेतकऱ्यांमध्ये अधिकाधिक जागृती करा असे आवाहन ही त्यांनी केले. याप्रसंगी आमदार डॉ किरण लहामटे, आमदार सत्यजित तांबे यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी सरपंच,ग्रामसेवक, तलाठी,कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, खत विक्रेते यांसह शासकीय विभागांचे विविध अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी केले नायब तहसीलदार लोमटे यांनी आभार मानले.
नुकसानग्रस्तांचे व कांदा पिकाचे अनुदान कधी मिळणार
संगमनेर तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाले. मात्र कमी भाव मिळाल्याने शेतकरी अडचणीत आला. याबाबत विधानसभेत आपण वेळोवेळी आवाज उठवला असून सरकारने कांद्याला साडेतीनशे रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे. मात्र सर्व पूर्तता करूनही या गोष्टीची अंमलबजावणी झाली नाही. सरकारने तातडीने घोषणा केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करावी. तसेच अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या नुकसान ग्रस्तांची मदतही तातडीने मिळावी अशी मागणीही आमदार बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली.