सोनेवाडी चांदेकसारे नाला नंबर 29 रस्ताचे अस्तित्व धोक्यात…

0

वारंवार मागणी करूनही रस्त्याचे काम होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन 

पोहेगांव (प्रतिनिधी) : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी चांदेकसारे गावाला जोडणारा 29 नाल्यावरील एडंकी रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून पावसाळ्यात या रस्त्याने चालणे देखील जीव घेणे ठरत आहे. वारंवार या रस्त्याच्या कामासाठी स्थानिक नागरिकांनी शेतकऱ्यांनी मागणी केली. मात्र पूर्ण रस्त्याचे काम करण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे. यामुळे एडंकी व म्हसोबावाडी परिसरात राहणारे ग्रामस्थ संतप्त झाले आहे. त्यांनी कोपरगाव चे निवासी तहसीलदार प्रफुल्लता सातपुते यांना या संदर्भात लेखी निवेदन दिले. 

रोजचा दळणवळणाचा प्रश्न या खराब झालेल्या रस्त्यामुळे निर्माण झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना ही याबाबत वेळोवेळी अर्ज व माहिती देऊन या रस्त्याच्या कामात लक्ष घालण्याची विनंती ग्रामस्थांनी केली असल्याचे सांगितले. या रस्त्याचे काम तातडीने होण्यासाठी शेतकरी राहुल होन, सुनील बोंडखळ, बापूराव होन, शुभम होन, गोरखनाथ गव्हाणे, ज्ञानदेव सरोदे, दत्तात्रय होन, संदीप जावळे, तुकाराम लांडबले, मनोज गंगावणे आपल्या व्यथा मांडल्या. या रस्त्याच्या बाजूला 29 नाल्यावर जायपत्रे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून या शाळेत शिकणाऱ्या सर्वसामान्य व आदिवासी बांधवांच्या विद्यार्थ्यांना पावसाळ्यात तर वाट शोधत चालावे लागते. दोन महिन्यांपूर्वी या शाळेतील विद्यार्थ्याला सर्पदंश झाला होता.

दैव बलवत्तर म्हणून त्याला शिक्षकांनी व पालकांनी तातडीने पी एम टी हॉस्पिटलला हलवल्याने त्याचा जीव वाचला. आता तर विद्यार्थी व शिक्षक जीव मुठीत धरून या रस्त्याने पावसाळ्यात प्रवास करतात. या रस्त्याचे तातडीने काम होण्यासाठी सेवानिवृत्त मुख्याध्यापक कल्याण होन यांनी देखील आवाज उठवला होता. मात्र त्याकडेही पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. शेतकरी दूध उत्पादक यांना याच रस्त्याने दररोज प्रवास करावा लागतो. या रस्त्याचे पूर्ण तीन किलोमीटरचे काम होणे अत्यंत गरजेचे असल्याने प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी राहुल होन यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here