कोपरगाव ( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यामध्ये हंगामात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना यातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याचे जाहीर केले. काही अंशी त्याचे वाटपही करण्यात येत आहे मात्र अजूनही 70% च्या वरती शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये चांदेकसारे परिसरातील सोनेवाडी येथील शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.या परिसरातील शेतकऱ्यांचे तातडीने अनुदान बँक खात्यात वर्ग करावे अशी मागणी गौतम बँकेचे उपाध्यक्ष बापूराव जावळे यांनी केली आहे.
मागील महिन्यात कोपरगाव तालुक्यात नुसकानीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे कृषी विभाग व महसूल विभागाकडून सांगण्यात येत होते. ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक गावातील शेतकऱ्यांनी आपले खाते नंबर व आधार कार्ड जमाही केले आहे मात्र शासनाकडून केवळ 30 टक्के लोकांना नुकसानीचे अनुदान जमा झाले आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता उर्वरित लोकांचेही अनुदानही जमा होईल अशी सांगण्यात येते. मात्र या परिसरातील शेतकरी ग्रामीण असल्याने त्याला प्रत्येक वेळी बँकेत चक्कर मारायला परवडत नाही. आपले पैसे आज येथील उद्या येतील या आशेवर शेतकरी बँकेचे उंबरठे झिजून काढत आहे. मात्र बँकेत गेल्यानंतर बाबा अजून आपले पैसे जमा झाले नाही असे बँकेच्या अधिकार्यांकडून जेव्हा सांगण्यात येते तेव्हा तेव्हा मात्र बँकेतून परत येताना शेतकऱ्याच्या अंगात त्रान शिल्लक राहत नाही. तेव्हा शेतकऱ्यांचा अंत न पाहता कृषी विभाग व महसूल विभागाने तात्काळ हे पैसे बँकेत का जमा होत नाही याची खातरजमा करावी.व नुकसानीच्या अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान तात्काळ त्यांच्या बँक खात्यात वर्ग करावे अशी मागणी जावळे यांनी केली आहे.