सोमैया महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न

0

कोपरगाव
“अवांतर वाचनाचे महत्त्व निर्विवाद असून त्यामुळे जीवनाला गती प्राप्त होते. अवांतर वाचनामुळे आपल्यामध्ये प्रगल्भता येते. विद्यार्थ्यांनी आपले संवाद कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी अवांतर वाचन केलेच पाहिजे. दुर्दैवाने आजचा तरुण वर्ग मीडिया आणि इंटरनेटच्या जाळ्यात  अडकलेला असून त्यातून बाहेर यायचे असेल तर वाचनाला पर्याय नाही” असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय सॉफ्ट स्किल ट्रेनर श्रीमती नेहा गुरावे यांनी केले. स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्र. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे म्हणाले की “दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि आपले करिअर करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. परंतु दुर्दैवाने सध्याचा विद्यार्थी हा वाचनापासून दूर जात आहे, ही खेदाची गोष्ट आहे.  विद्यार्थी दशेपासूनच वाचनाची सवय आणि स्वयंशिस्त आपणअंगी बाळगली पाहिजे तरच, आपण खऱ्या अर्थाने प्रगत होऊ शकतो. आपल्या महाविद्यालयात अत्यंत सुसज्ज व समृद्ध असे ग्रंथालय असून आणि तेथे हजारो ग्रंथ आहेत. त्यांचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि करिअर करावे.”

कार्यक्रमाच्या प्रारंभी  ग्रंथपाल डॉ. नीता शिंदे यांनी प्रास्ताविक व अतिथी परिचय करून देताना वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य आणि महत्त्व स्पष्ट करतानाच मानवी जीवनात ग्रंथ आणि ग्रंथालयाचे महत्त्व प्रतिपादित केले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित  ग्रंथ-प्रदर्शनाचे उद्घाटन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे व मा. सुनील बोरा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. डॉ. रवींद्र जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले, तर डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, स्वप्निल आंबरे, गणेश पाचोरे, विकास सोनवणे, रवींद्र रोहमारे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here