कोपरगाव
“आज पर्यंत मी अनेक माजी विद्यार्थी मेळाव्यांमध्ये सहभागी झालो. परंतु आज पहिल्यांदा आपल्या महाविद्यालयाविषयी आजीजीने ऋण व्यक्त करणार्या माजी विद्यार्थ्यांना ऐकल्यानंतर असे लक्षात आले की कमीत कमी फी मध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारे हे कोपरगाव परिसरातील कदाचित एकमेव महाविद्यालय असावे. आज या महाविद्यालयात पीएच.डी. साठी सात विषयांची संशोधन केंद्रे सुरू आहेत आणि या केंद्रांमध्ये केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील 200 विद्यार्थी संशोधन करीत आहेत, ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. कदाचित या महाविद्यालयाच्या मातीतच ज्ञान आणि आत्मविश्वास वाढविणारा गुणधर्म असावा, असे वाटते.” असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक सुधीर डागा यांनी येथे केले. स्थानिक के जे सोमय्या महाविद्यालयात मूल्यांकनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. को. ता. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
माजी विद्यार्थ्यांची भाषणे ऐकून भारावून गेलेले संस्थेचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे म्हणाले की “27 वर्षांपूर्वी मी या संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले तेव्हा केवळ १२०० विद्यार्थी संख्या होती जी आज ८००० पर्यंत गेलेली आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सतत नवनवीन आणि अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. येथे प्राध्यापक भरती करताना ज्ञान आणि गुणवत्तेलाच अग्रक्रम दिला जातो. येथील प्राध्यापक वृंद आणि कर्मचारी वर्गाच्या अथक परिश्रमामुळेच महाविद्यालयाला आज हा लौकिक प्राप्त झालेला आहे.”
याप्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष बापूसाहेब घेमूड, सचिव विनायक रक्ताटे तसेच सुरेश देशमुख, संभाजी नाईक, रवींद्र धस, प्रा. डॉ. संजय बनसोडे आदिनाथ ढाकणे, प्रकाश जमधडे सिमरन पठाण, रणजीत खळे, गौरी कुर्लेकर, श्रीकांत तिरसे, विनोद थोरात, सौरभ सोळसे, विशाल पंडोरे, साईनाथ शिंदे यांनी महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देऊन महाविद्यालय आणि येथील प्राध्यापकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यातील अनेक माजी विद्यार्थी आज अनेक शासकीय व निमशासकीय क्षेत्रात अधिकारी पदावर तसेच उद्योग-व्यवसायात आघाडीवर आहेत. याप्रसंगी नाशिक पोलीसमध्ये नुकतीच निवड झालेल्या कु. सिमरन पठाण आणि कु. अश्विनी लुटे व कु. प्रज्ञा चासकर या गुणवान विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मेळाव्याचे प्रास्ताविक करताना अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. व्ही. सी. ठाणगे यांनी विद्यार्थी-शिक्षक संवाद कसा महत्त्वाचा आहे, तसेच नॅकच्या पार्श्वभूमीवर तर तो आणखी महत्त्वाचा आहे हे ही समजावून सांगितले . नॅक समितीच्या भेटीच्या अनुषंगाने सर्व माजी विद्यार्थ्यांनी आजच्यासारखे येत्या २६ जुलै रोजी देखील उपस्थित राहून महाविद्यालयाप्रती आपला स्नेह व्यक्त करावा, असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प आणि महाविद्यालयाच्या ‘गोदातरंग वार्षिकांकाचा के. बी. रोहमारे विशेषांक’ भेट देऊन त्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. या मेळाव्याला १५० पेक्षा अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते. मेळाव्याचे समन्वयक डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले तर प्रो. जिभाऊ मोरे यांनी सूत्रसंचालन केले.