सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयात विविध विषयांवर जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

0

कोळपेवाडी वार्ताहर :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यार्थी विकास मंडळ व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशीलामाई काळे, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गौतमनगर यांचे संयुक्त विद्यमाने संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली (दि.२८) ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत विविध विषयांवर जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न झाल्या असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या  डॉ .सौ. विजया गुरसळ यांनी दिली आहे.

या जिल्हास्तरीय कार्यशाळेत (दि.२८) रोजी अॅड. मनोज कडू यांनी रॅगिंग विरोधी कायदा व नियम या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांसाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी रॅगिंग केल्यास या कायद्यातील तरतुदीनुसार पाच वर्षे विद्यार्थ्याला निलंबित व्हावे लागते. प्रमुख व्याख्याते म्हणून साईबाबा महाविद्यालयाचे इंग्रजी विभागाचे प्राध्यापक शिवनाथ तक्ते यांनी” साहित्य लेखन व पथनाट्य” या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, कविता हे एक प्रभावी माध्यम आहे. कविता निर्माण करण्यासाठी कवीच्या अंगी सृजनशीलता असणे गरजेचे आहे. लेखक आपल्या शब्दातून जादू निर्माण करतो. खडकाला पाझर फोडण्याची कला साहित्यिकांच्या अंगी असणे गरजेचे असते. दुसरे व्याख्याते मोबीन शेख यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करतांना साहित्य लेखनाचा वारसा संत ज्ञानेश्वर माऊलींपासून सुरू झाला असल्याचे सांगत, पथनाट्य सादर करतांना रस्त्यावरील नागरिकांना कसे खिळवून ठेवतांना प्रबोधन कसे करता येईल याचे प्रशिक्षण  विद्यार्थ्यांना दिले. मशरूम शेती प्रशिक्षण या विषयावर मार्गदर्शन करताना एस.एस. जी. एम. महाविद्यालयाचे प्रा. स्वप्निल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मशरूम शेती विषयक शास्त्रीय ज्ञान देवून मशरूम शेतीद्वारे स्वावलंबी कसे होता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले. 

या कार्यशाळा कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ .सौ. विजया गुरसळ यांनी भूषविले. विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा. सिकंदर शेख यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. समन्वयक प्रा. रविंद्र खाडे प्रा.उमाकांत कदम व प्रा. अमित काळे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विशाल पोटे व प्रा. डॉ.हरिभाऊ बोरुडे यांनी केले तर प्रा.सोमनाथ खरात यांनी आभार मानले. याप्रसंगी महाविद्यालयासह इतर महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here