कोपरगाव-; स्त्रियांवरील अत्याचार हा वैचारिक भेद आहे. तो पुरुष जसा करत असतो, तशीच स्त्री देखील करत असते. कारण आपली वैचारिक घडण तशी झालेली असते. त्यामुळे विचारात बदल करण्याची गरज आहे. चुका झाल्यास ती सुधारण्याची गरज आहे. कायदे व अधिकार असूनही महिलांवरील अत्याचार वाढण्यामागे समाज दृष्टिकोन कारणीभूत आहे. स्त्री -पुरुष यांना वेगळे करणे म्हणजे जीवनातील अर्थ काढून घेण्यासारखे आहे. असे असूनही पारंपरिक दृष्टिकोन ठेवून स्त्री-पुरुषाबद्दल व पुरुष-स्त्रीबद्दल विचार करतो. याचे उदाहरण म्हणून महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरण आणि रामायणातील राम वनवास या घटना लक्षात घेता येतील.असे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केले.
येथील एस.एस.जी.एम.कॉलेजमध्ये ‘विद्यार्थी विकास मंडळ’ आणि ‘महिला कल्याण व स्त्री सबलीकरण समिती’च्या वतीने नुकताच निर्भय कन्या अभियान कार्यक्रम घेण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून देसले बोलत होते.
प्रमुख वक्त्या डॉ. मंजुषा गायकवाड यांनी,चांगल्या विचारासाठी चांगले मन असण्याची आणि त्या चांगल्या मनासाठी चांगले शरीर असण्याची गरज असल्याचे सांगितले. शारीरिक सुदृढता आणि त्यासंबंधीच्या गैरसमजुती पटवून देताना डॉ.गायकवाड यांनी दैनंदिन जीवनातील काही स्वानुभव कथन केले. त्यातील उदाहरणाद्वारे छोट्या वाटणाऱ्या बाबीही मोठ्या आजाराचे स्वरूप कसे धारण करतात, हे पटवून दिले. आत्मविश्वास,कर्तृत्व हेच आपले सौंदर्य व
सामर्थ्य असल्याचे सांगताना त्यांनी, स्त्री सक्षमतेवरच सर्व घराची सक्षमता अवलंबून आहे. कारण संपूर्ण घर आजारी पडले तर स्त्री त्याला सामोरी जाऊ शकते; पण एक स्त्री आजारी पडली तर सर्व घर आजारी पडते, असे सांगितले.
यावेळी कराटे प्रशिक्षक कु. वर्षा देठे यांनी विद्यार्थिनींना स्व-संरक्षणाच्या काही कृतीद्वारे प्रशिक्षण दिले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र.प्राचार्य डॉ.आर.आर.सानप हे होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते म्हणाले की “आज इतक्या सुविधा, कायदे, अधिकार प्राप्त आहेत की, त्यामुळे निर्भय कन्या अभियान/ प्रशिक्षण कार्यक्रमाची गरजच नाही. स्त्री मनाने सक्षम होण्याची गरज आहे.स्त्रियांच्या संख्येसोबत संघटन महत्त्वाचे आहे.इंदिरा गांधी, द्रौपदी मुर्मू, श्रीलंकेच्या श्रीमती भंडारनायके, मार्गारेट थॅचर, सर्वात बुद्धिमान ठरलेली भारतीय वंशाची मुलगी नताशा ही उदाहरणे, बौद्धिक उंची हेच स्त्रीचे सामर्थ्य, सौंदर्य व सबलीकरण दाखविणारी आहेत. हे स्त्रियांनी लक्षात घ्यावे. तसेच पुरुषांनीही F.R.I चे आपल्या जीवनावर होणारे दुष्परिणाम वेळीच ओळखावे.”
विद्यार्थी विकास मंडळाचे चेअरमन डॉ. यशवंत यांनी प्रास्ताविकाद्वारे ‘निर्भय कन्या अभियाना’मागील विद्यापीठाची भूमिका स्पष्ट केली.तर ‘महिला कल्याण व स्त्री सबलीकरण’ समितीच्या चेअरमन डॉ.उज्ज्वला भोर यांनी भारताचे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्ष आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अमृत महोत्सवी वर्ष यांच्या सुवर्णयोगाची आठवण देऊन मान्यवर व्याख्यात्यांचा परिचय करून दिला.
प्रा.डॉ.वैशाली सुपेकर यांनी उपस्थितांप्रति कृतज्ञता व्यक्त केली, तर डॉ.सीमा चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुभाष रणधीर, कार्यालयीन अधीक्षक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.