संगमनेर : महविद्यालयीन जीवनात घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग नोकरी मिळण्यासाठी करण्यापेक्षा उद्योजक बनण्यासाठी करा. जीवनाच्या यशाचा मार्ग त्यातच दडलेला आहे. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर स्वतःचा मार्ग निर्माण करावा लागेल. स्पर्धा हीच प्रगतीची खरी जननी असल्याचे प्रतिपादन अमेरिकेतील प्रतिथयश उद्योजक जगदीश रुघानी यांनी केले.
डॉ. आर. एस. गुंजाळ वेल्फेअर फौंडेशन संचलित कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात आयोजित उद्योजकता विकास कार्यक्रमात रुघाणी बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. राधेश्याम गुंजाळ अध्यक्षस्थानी होते. सचिव तथा व्यवस्थापकीय संचालक राहुल गुंजाळ, अदिक रंगोली, पुणेचे प्रकल्पप्रमुख हितेश चोटाई, गुणवत्ता व्यवस्थापक निलेश उंडे, विश्वस्त उषा गुंजाळ, रश्मी रुघानी, एबीएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. जयसिंग लामटूळे यावेळी उपस्थित होते.रुघानी म्हणाले, जगात सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. या युगात टिकून यशस्वी व्हायचे असेल तर शैक्षणिक गुणवत्तेबरोबर व्यावहारिक ज्ञान वाढविण्याची गरज आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही, तर प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करावी लागते. म्हणून नोकरी हेच अंतिम ध्येय न ठेवता उद्योजकतेतून जीवनाचा आणि समाजाच्या उत्कर्षाचा भाग बना असे आवाहनही त्यांनी केले. गुंजाळ म्हणाले, छोट्या व्यवसायातच मोठ्या उद्योगाचा पाया दडलेला असतो. उद्योग-व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर माणस जोडण्याची कला अवगत करायला हवी. समाजाला सोबत घेऊनच उद्योग विश्वात यशाची भरारी घेता येते, असे ते म्हणाले. प्रास्तविक व सूत्रसंचालन संस्थेचे जनसंपर्क अधिकारी काशिनाथ गुंजाळ यांनी केले. पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालयाचे प्राचार्य विक्रम भैय्ये यांनी आभार मानले.