– कारवाडी ग्रामपंचायतच्या नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा
कोपरगाव : माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांनी जीवनभर जनहितासाठी काम केले. आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा, आदर्श संस्था कशा असाव्यात हे स्व. कोल्हे साहेबांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. आपल्या कारवाडी, शहा भागावर स्व. कोल्हे साहेबांचे विशेष प्रेम होते. यापुढील काळातही आम्ही या परिसरातील समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांनी केले.
सिन्नर तालुक्यातील मौजे कारवाडी (शहा) ग्रामपंचायतच्या नूतन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा शनिवारी (१४ जानेवारी) आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे साहेब, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मजूर फेडरेशनचे संचालक भारत कोकाटे, साहेबराव सोमासे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष रमेश घोडेराव, माजी उपाध्यक्ष अरुणराव येवले, संचालक राजेंद्र कोळपे, मनेष गाडे, सतीश आव्हाड, रघुनाथराव फटांगरे, जयवंतराव आव्हाड, भाऊसाहेब जाधव, रेवबा जाधव, कुऱ्हाडे, नवनाथ चिरके, अनिल जाधव, उदय सांगळे, श्रीकांत चांदगुडे, गंगाधर विघ्ने, छबुराव थोरात,दादासाहेब जाधव आदींसह कारवाडी ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच रुपाली निलेश जाधव, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
विवेक कोल्हे म्हणाले, जनतेतून सरपंच निवडून देताना गावकऱ्यांचा विश्वास सरपंच पदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारावर असावा लागतो. तरच गावकरी त्यांना निवडून देतात. जर काम करायचे असेल तर सत्ता असो किंवा नसो, इच्छाशक्ती असेल तर काम निश्चित करता येते. पूर्वी कारवाडी शहा ग्रामपंचायतअंतर्गत होती. २५ वर्षांपासून कारवाडीला महसुली गावाचा दर्जा मिळाला असून, आतापर्यंत ग्रामपंचायतच्या पाच पंचवार्षिक निवडणुका झाल्या आहेत. गावकऱ्यांनी नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर मोठा विश्वास टाकून त्यांना काम करण्याची संधी दिली आहे. कारवाडीच्या ग्रामस्थांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून नवीन सरपंच व ग्रा. पं. सदस्यांनी गावच्या विकासासाठी काम करावे. वीज, रस्ता आणि शुद्ध पाणी जर आपण देऊ शकलो तर लोकांनी आपल्यावर जो विश्वास टाकला आहे तो सार्थकी लावल्यासारखे होईल. आपल्या गावाचा, परिसराचा विकास करण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. महात्मा गांधी म्हणायचे की, खेड्याकडे चला. गावाचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. देशाची सेवा करायची असेल तर सैन्य दलात जाण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक गावातील सरपंच व ग्रा. पं. सदस्यांनी आपल्या गावच्या समस्या सोडवल्या तर आपला भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत कोल्हे यांनी व्यक्त केले.
चंद्रशेखर बावनकुळे हे उर्जामंत्री असताना या भागातील विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन आमदार व भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांना माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी साथ दिली. राजाभाऊ वाजे यांनी पुढाकार घेऊन शहा येथे विद्युत उपकेंद्रासाठी १६ एकर जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील कारवाडी, मंजूर, हंडेवाडी आदी अनेक गावांचा विजेचा प्रश्न सुटण्यास मदत झाली, याचा विवेकभैय्या कोल्हे यांनी आवर्जून उल्लेख केला. पाटपाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी राजाभाऊ वाजे यांनी स्नेहलताताई कोल्हे यांना साथ दिली. गेल्या दोन-तीन वर्षांपासून पाऊसपाणी चांगले आहे; पण ढिसाळ नियोजनामुळे पाटपाण्याच्या समस्या भेडसावत आहेत.
स्व.शंकरराव कोल्हे साहेब अनेक वर्षेत सत्तेत होते; पण जनतेचे काम झाले नाही तर ते रस्त्यावर उतरायचे. स्व. कोल्हे साहेबांनी येसगाव ग्रामपंचायत आदर्श करण्याचा संकल्प करून तो पूर्ण केला. संपूर्ण गाव हागणदारीमुक्त केले. सर्व प्रश्न सोडवून घेतले. दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते येसगावला आदर्श गाव म्हणून पुरस्कार मिळाला. देश पातळीवर येसगावचा गौरव झाला. आदर्श गाव कसा असावा, आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा, आदर्श संस्था कशा असाव्यात हे स्व. कोल्हे साहेबांनी कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांच्या विचारांचा वारसा आज आम्ही पुढे नेत आहोत. स्व. कोल्हे साहेबांचे कारवाडी, शहा भागावर विशेष प्रेम होते. या भागातील अनेक लोकांना त्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळात काम करण्याची संधी दिली. आम्हीदेखील या भागावर यापुढेही लक्ष देऊन येथील जनतेची सेवा करत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. विवेक कोल्हे यांनी कारवाडी ग्रामपंचायतच्या नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. भाऊसाहेब आदिक, दादासाहेब जाधव, रेवबा जाधव आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.