शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर
कोपरगाव ( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ,सोनेवाडी, जेऊर कुंभारी,कोकमठाण हा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा परिसर होता. त्याला कारणही तसेच होते पाटबंधारे विभागाकडून वेळेवर शेतीला पाणी मिळत होते. मात्र गेल्या काही वर्षापासून पाटबंधारे विभागाकडून जाणीवपूर्वक हरिसन ब्रँच चारीवर दुर्लक्ष होत असून येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतीला पाटबंधारे विभागाच्या मेहरबानीवरच पाणी मिळत आहे. गेल्या पंधरा दिवसापासून गोदावरी कालवा पूर्ण क्षमतेने वाहत असून मिनी कालवा म्हणून ओळख असलेली ही चारी सध्या कोरडी ढाक पडलेली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये पाटबंधाराच्या विरोधात तीव्र नाराजीचा सूर निघत आहे.
कोपरगावातील राजकीय नेते आ आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांच्यासह शिवसेनेचे नितीन औताडे यांनी देखील शेतकऱ्यांना गोदावरी कालवा सुटल्यानंतर चितळीला टेलला पाणी पोचल्यावर हरिसन ब्रँच चारी सोडण्यासाठी वेळोवेळी मागणी ,आंदोलने, उपोषणे केली आहे. माजी मंत्री स्वर्गीय शंकराव कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी झगडे फाटा परिसरात रस्ता रोको देखील केला होता. तेव्हा काही अंशी पाटबंधारे विभाग जाग्यावर आला होता. मात्र पुन्हा जैसे तैसे परिस्थिती या चारीच्या बाबतीत दिसून येत आहे. चांदेकसारे ,सोनेवाडी ,डाऊस खुर्द, जेऊर कुंभारी कोकमठाण आधी हजारो हेक्टरचा परिसर या चारीच्या पाण्यावर अवलंबून आहे.सध्या तीव्र प्रमाणात उन्हाळा असून शेतकऱ्यांना आता आपली चारा पिके व ऊस पिके व फळबागा वाचवणे गरजेचे आहे. मात्र पाटबंधारे विभागाकडून अजूनही ही चारी सुटत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. सन 2005 साली समन्यायी पाणी वाटप कायदा झाला आणि त्यानंतर सन 2012 पासून ही हरीसन ब्रँच चारी पाटबंधारे विभागाच्या मेहरबानी वरच सुटते आहे. पूर्वीप्रमाणे गोदावरी कालव्याचे पाणी चितळीला पोहोचल्यानंतर मिनी कालवा म्हणून ओळख असलेली ही चारी पाटबंधारे विभागाकडून सोडली का जात नाही? असा सवालही शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. मेटाकुटीला आलेला शेतकरी पाटबंधारे विभागाच्या ऑफिसवर जाऊन अधिकाऱ्यांना चारी कधी सुटली जाणार असा प्रश्न विचारतो मात्र आज सुटेल उद्या सुटेल असे सांगून पाटबंधारे विभागाचे अधिकारी वेळ मारून नेत असतात. अशीच परिस्थिती जर या चारी संदर्भात राहिली तर हरीसन ब्रँच लाभ क्षेत्रातील हजारो हेक्टरचा परिसर वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. पाटबंधारे विभागाच्या या धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमीन पडीक ठेवलेल्या आहेत. पाटबंधारे विभागाला सदबुद्धी होवो आणि ही हरिसन ब्रँच चारी वाहती होहो हीच अपेक्षा….