संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील
उद्या रविवार दिनांक १८ डिसेंबर रोजी तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.३७ सरपंच पदाच्या जागा पैकी दोन गावात सरपंच पदासाठी मतदान होणार नसून उर्वरित सदस्यांसाठी मतदान होणार आहे. ३६७ सदस्यांच्या जागा पैकी २९४ जागांसाठी मतदान पार पडणार असून ३७ पैकी दोन सरपंच आणि ३६७ पैकी ७३ सदस्य अर्ज माघारीच्या दिवशीच बिनविरोध निवडून आले असून त्यांच्या निवडीची केवळ घोषणा बाकी आहे. मतदानाचा दिवस उद्यावर येऊन ठेपल्याने स्थानिक सर्वपक्षीय पुढार्यांचे मात्र टेन्शन वाढले आहे.
गेल्या दहा पंधरा दिवसापासून संगमनेरच्या ग्रामीण भागात निवडणुकीची धामधूम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कालचा प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने स्थानिक सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोटार सायकल रॅली व पायी रॅली काढत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. निवडणुका होत असणारी काही गावे संवेदनशील तर काही गावे असवेदनशील असल्याने या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला जाणार आहे. ३७ ग्रामपंचायतीसाठी ५१ हजार ७७२ पुरुष मतदार तर ४७ हजार ६१४ महिला मतदार असे तब्बल ९९ हजार ३८६ मतदार आपल्या मतदानाचा हक्क या निवडणुकीत बजावणार आहेत. ३७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांपैकी सायखिंडी आणि डोळासने येथे प्रत्येकी एक एक उमेदवारी अर्ज असल्याने येथील सरपंच बिनविरोध निवडून आल्यात जमा आहेत. तसेच ३७ गावातील तब्बल ३७३ सदस्य पदांपैकी ७३ सदस्य बिनविरोध निवडून आले असून दोन सरपंच आणि ७३ बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांच्या अधिकृत निवडीच्या घोषणेची औपचारिकता केवळ बाकी आहे. मात्र ३५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आणि ३६७ पैकी २९४ सदस्य पदासाठी सर्वच ठिकाणी काट्याची टक्कर होणार असून कोण विजयी होईल हे सांगणे अवघड झाले आहे. ३७ गावात मतदान होणार असल्याने या गावात १५८ मतदान केंद्र असणार आहेत. एका केंद्रासाठी एका पोलीस कर्मचाऱ्यासह पाच निवडणूक कर्मचारी असणार आहेत. २५ निवडणूक निर्णय अधिकारी आणि १ राखीव निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह १०८० कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार असून मंगळवार दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शहरातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात असणाऱ्या बॅडमिंटन हॉलमध्ये या निवडणुकीची २० टेबलवर ८ फेऱ्यात मतमोजणी होणार असून दुपारी २ वाजेपर्यंत या निवडणुकीचा अंतिम निकाल येणे अपेक्षित आहे. मतमोजणीसाठी स्वतः उमेदवार किंवा उमेदवाराच्या केवळ एका प्रतिनिधीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार असून त्यासाठी ओळखपत्र घेऊन जाण्याचे आवाहन तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे. निवडणुका होणार असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये रहिमपूर, जोर्वे, कोल्हेवाडी, ओझर खुर्द, उंबरी बाळापुर, निंबाळे, मालुंजे, कनकापूर, सादतपूर, निमगाव जाळी, हंगेवाडी, साकुर, जांभूळवाडी, जांबुत बुद्रुक, रणखांब, दरेवाडी, डोळासणे, कर्जुले पठार, सायखिंडी, कोळवाडे, निमोण, निमगाव भोजापूर, चिकणी, धांदळफळ बुद्रुक, धांदळफळ खुर्द, पोखरी हवेली, निळवंडे, करुले, वडझरी बुद्रुक, वडझरी खुर्द, चिंचोली गुरव, तळेगाव दिघे, पिंपरणे, घुलेवाडी, वाघापूर, खराडी, अंभोरे या ३७ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.आजचा दिवस आणि रात्र महत्त्वाची असल्याने उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व स्थानिक पुढाऱ्यांकडून मतदारांना आपलेसे व आकर्षित करण्यासाठी “लक्ष्मी दर्शन” घडवले जाण्याची शक्यता आहे, हे होऊ नये यासाठी छुपे पथक कार्यरत असणार आहे. या निवडणुकात स्थानिक पुढाऱ्यांनी आपापल्या विरोधकांना आस्मान दाखवण्यासाठी आणि ग्रामपंचायतीचे मैदान मारण्यासाठी कंबर कसली आहे.ग्रामपंचायतच्या निवडणुका ह्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबरोबरच विधानसभा, लोकसभा आणि इतर निवडणुकांची रंगीत तालीम असल्याने या निवडणुकांकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि त्यांचे पारंपारिक विरोधक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे उद्या १८ डिसेंबरला होणाऱ्या या निवडणुकात कोण कोणाला चितपट करणार हे मतमोजणीच्या दिवशी म्हणजे मंगळवार दिनांक २० डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. सध्या तालुक्यात गुलाबी थंडी पडली आहे. या थंडीत तालुक्यातील ग्रामीण भागातील राजकीय वातावरण मात्र गरमागरम झाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक या निवडणुकीत एकमेकाची जिरवण्यासाठी सज्ज झाले असून डाव प्रति डाव टाकण्यासाठी आजची शेवटची रणनीती आखली जाणार आहे. एकूणच या निवडणुकांकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
निवडणूक प्रक्रियेसाठी चोख बंदोबस्त ..!
निवडणुका होणार असणारी जवळजवळ सर्वच गावे संवेदनशील व अतिसंवेदनशील असल्याने संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत २३, घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७, शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ तर आश्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३ ग्रामपंचायती येत असल्याने शहराचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले, तालुक्याचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील तर आश्वीचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.