कोळपेवाडी वार्ताहर :- कधी होणार, कधी होणार याची संपूर्ण कोपरगावकरांना लागलेली ओढ संपुष्टात आली असून रविवार १५ सप्टेंबर कोपरगावकरांसाठी ‘सुवर्ण दिवस’ ठरणार असून दुपारी ३.०० वाजता ५ नंबर साठवण तलावाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी सोमवार (दि.०९) रोजी पत्रकात परिषदेत दिली. गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगाव शहराला अनियमित पाणी पुरवठा होत आहे . त्याला अपुरी साठवण क्षमता,अपुरी आणि नादुरुस्त शुद्धीकरण यंत्रणा , विस्कळीत वितरण व्यवस्था, त्याही पेक्षा नगर परिषदेचे गलथान व्यवस्थापन याला कारणीभूत मानले जाते. गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी शहरातील नागरिकांना दिलेल्या आश्वासना प्रमाणे १३१ कोटी रुपयांची पाणी योजना राबवली . ती आता पूर्णत्वास जात आहे. त्यापमाणे रविवारी १५ सप्टेंबर रोजी ५ व्या साठवण तलावामध्ये पाणी सोडण्यास सुरवात होणार असून आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते जलपूजन होणार असून पुढील काही दिवसात संपूर्ण योजना कार्यान्वित होऊन शहराला किमान दिवसाआड पाणी पुरवठा होईल अशी माहिती आमदार काळे यांनी यावेळी दिली.
आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे पत्रकार परिषद घेवून कोपरगावकरांची तहान भागविण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ५ नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याबद्दलची माहिती देवून कोपरगावकरांना या जलपूजन कार्यक्रमाच्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कोपरगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे. यावेळी पत्रकात परिषदेत बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, बहुचर्चित असलेल्या ५ नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे जात असून साठवण तलावाच्या पाण्याचे जलपूजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी ५ नंबर साठवण तलावाचे काम सुरु करण्यापासून काम पूर्णत्वाकडे जाईपर्यंतचा इतिहास आ. आशुतोष काळे यांनी यावेळी पत्रकात परिषदेत मांडला.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ५ नंबर साठवण तलावाचे काम व्हावे यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नऊ दिवस धरणे आंदोलन केले. त्यावेळी समृद्धी महामार्गाचे काम सुरु असल्यामुळे ५ नंबर साठवण तलावाचे जागेवर असणारे दगडमाती समृद्धी महामार्गासाठी वापरले जावे अशी मागणी केली मात्र त्यावेळी काय राजकारण झाले हे कोपरगावकरांना माहिती आहे. मात्र निवडून आल्यावर दोनच महिन्यात दगडमाती उचलण्याच्या कामाला प्रारंभ केला.त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेचे ५ नंबर साठवण तलावासाठीचे जवळपास सात ते आठ कोटी रुपये वाचले. शासनाकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी प्रशासकीय मान्यता मिळाली १३१.२४ कोटीच्या कामाचे टेंडर देखील निघाले व कामही सुरु झाले मात्र त्यानंतर काही दिवसांनी राज्यातील सरकार बदलले परंतु कामाचे टेंडर सर्वकाही नियमानुसार असल्यामुळे अडचणी आल्या नाही.
पालिकेच्या हिश्याची १५ टक्के रक्कम पालिकेला भरणे शक्य नव्हते . उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून हि १५ टक्केची जवळपास २० कोटीची रक्कम राज्य शासनाकडून माफ करून घेतली. विधानसभा निवडणुकीवेळी प्रचारादरम्यान कोपरगाव शहरात गल्ली बोळात गेलो असतांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस पाणी साठवून ठेवलेल्या प्लास्टिकच्या टाक्या पाहून कुणी आजारी पडले तर त्याठिकाणी चारचाकी वाहन देखील पोहोचू शकत नव्हते अशी परिस्थिती होत मात्र छोट्याशा जागेत राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना त्याशिवाय दुसरा पर्याय पण नव्हता हि परिस्थिती मी स्वत: पाहिली असल्यामुळे हि परिस्थिती मला बदलावी वाटली व मला समाधान असल्याचे काळे यांनी यावेळी सांगितले
५ नंबर साठवण तलावाचे काम होवू नये यासाठी सात ते आठ वेळेस वेगेवगळ्या नावाने न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आले. त्याबाबत आजपर्यंत २२ तारखा झाल्या आहेत. काम थांबले जावे यासाठी पाच ते सहा ज्येष्ठ विधी तज्ञांची फौज यासाठी लावण्यात आली असून आजही तारखा सुरु आहेत. अजूनही हे काम कसे थांबविता येईल यासाठी विरोधकांकडून प्रयत्न सुरु आहेत.-आ.आशुतोष काळे.