पुणे : राज्यात यंदा मान्सून रुसला आहे. जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस चांगला झाला नाही. ऑगस्ट महिन्यात दीर्घ सुटी पावसाने घेतली आहे. राज्यात सर्वत्र यंदा पावसाने सरासरी गाठली नाही.
यंदा समाधानकारक पाऊस नसताना मान्सूनच्या परतीचा प्रवास निश्चित झाला आहे. यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्व राजस्थानमधून सुरु होणार आहे. 17 सप्टेंबरपासून हा प्रवास सुरु होणार आहे. महाराष्ट्रातून मान्सूनचा प्रवास उशिराने म्हणजे 5 ते 8 ऑक्टोबर दरम्यान होईल. लंडनमधील हवामान शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी ही माहिती दिली आहे.
परतीच्या प्रवासाची तारीख बदलली
दहा वर्षांपूर्वी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची तारीख एक सप्टेंबर होती. परंतु आता मान्सून लहरी बनला आहे. त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची तारीख बदलत आहे. मागील वर्षी 20 सप्टेंबर रोजी राजस्थानातून परतीचा पाऊस निघाला होता तर 20 ऑक्टोबर रोजी राज्यातून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. पुणे जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत केवळ 443.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तीन महिन्यात पाऊस सरासरीच्या 66.3 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 322.8 मिलिमीटर कमी पाऊस झाला आहे. आता परतीच्या पावसाची तारीख झाली आहे.
काय आहे पुणे जिल्ह्याची सरासरी
पुणे जिल्ह्याची पावसाची सरासरी 766.7 मिलिमीटर आहे. परंतु यंदा आतापर्यंत केवळ 66.3 टक्के पाऊस झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पावसाच्या आकडेवारी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जलसाठा झाला असला अजून दमदार पाऊस झालेला नाही.