मुंबई : नोटबंदीच्या काळात आणलेली 2000 रुपयांची नवी नोट मागे घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. सध्यातरी 2000 रुपयांच्या नोटा वैध चलन असतील, पण लोकांनी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत त्या बँकेत जमा कराव्यात, असं आवाहन रिझर्व्ह बँकेने केलं आहे.
2000 रुपये मूल्य असलेली गुलाबी रंगाची नोट रिझर्व्ह बँकेने 7 वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 साली चलनात आणली होती. यानंतर गेल्या काही दिवसांत ही नोट बाजारात दिसणं अत्यंत कमी झालं होतं.
रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, या नोटांची छपाई 2018-19 मध्येच बंद करण्यात आली होती. व्यवहारात त्यांचा वापर कमी असल्याने, तसंच इतर मूल्याच्या नोटांची उपलब्धता पुरेशी असल्याने अखेर 2000 रुपयांच्या नोटा छापणं बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.