40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट पलटी होऊन 21 जणांचा मृत्यू

0

केरळच्या मलप्पुरममधील तनूर भागात रविवारी सायंकाळी सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट पलटी होऊन 21 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21 वर पोहोचली असून सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. शोधकार्य अजूनही सुरु असून बोटीखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. बुडालेली बोट किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

अपघातानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरु केले. या बचाव कार्यात अनेक स्वयंसेवक-कार्यकर्तेही मदत करत आहेत. लोकांचा शोध घेणं, जिवंत असलेल्यांना वाचवणं आणि जखमींना रुग्णालयात नेणं ही प्रक्रिया रात्रभर सुरु होती. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक प्रवास करत होते. यासोबतच बोटीवर संरक्षण उपकरणं नसल्याचंही बोललं जात आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण समुद्रापासून काही अंतरावर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

या अपघातानंतर राज्याचे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. जखमींवर तज्ज्ञांकडून तातडीने उपचार व्हावेत आणि शवविच्छेदन प्रक्रियाही जलद व्हावी, जेणेकरुन मृतदेह लवकरात लवकर नातेवाईकांच्या ताब्यात देता येतील, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here