नागपूर : भूखंड घोटाळ्यावरून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मुद्यावरून नागपूर इथे सुरू असलेल्या विधिमंडळात विरोधकांनी सभात्याग केला.
नगर विकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड वाटपाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाने या निर्णयावर ताशेरे ओढले आहे.
या मुद्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने मंगळवारी विधान परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मागणीला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. या मुद्यावर सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्याने सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आलं.
मुख्यमंत्री शिंदे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान 83 कोटी वगैरे आस्मानी आकडे पूर्णपणे चुकीचे आहेत. मी वरच्या सभागृहात उत्तर दिलंय, येथेही देतो. आम्ही भूखंडाचे श्रीखंड खाणारे नाहीत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी देखील राजीनाम्याची मागणी केली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना मुख्यमंत्र्यांनी पदावर राहणे योग्य नाही, असे ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही त्यांच्यावर आरोप केलेला नाही तर थेट न्यायालयाने सुओ मुटो घेऊन म्हणजे स्वतः पुढाकार घेऊन या प्रकरणाची दखल घेतली आहे.”
लव्ह जिहादला विरोध नाही – फडणवीस
लव्ह जिहादचा मुद्दा आज पुन्हा विधानसभेत गाजला.
“लव्ह जिहादसंदर्भात कायद्याची मागणी करण्यात आली आहे. सभागृहाला स्पष्ट करू इच्छितो की आंतरधर्मीय लग्नाला विरोध नाही. मात्र गेल्या काही काळात जाणीवपूर्वक काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये असे विवाह होत आहेत. त्या मुलीचा छळ होतो, तिला परत यावं लागतं. अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येताना दिसत आहेत. काही राज्यांनी लव्ह जिहादसंदर्भात कायदे केलेत. लव्ह जिहाद विषय केरळ राज्यात बाहेर आला. केरळच्या पोलिसांनी त्याला हे नाव दिलं आहे. धर्माच्या विरोधात जाऊन, व्यक्तीच्या विरोधात जाऊन काही करायचं नाहीये”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “अशा प्रकारच्या केसेस होत आहेत हे आपल्याला स्वीकारायला हवं. वेगवेगळ्या राज्यांनी जे कायदे यासंदर्भात केले आहेत त्याचा अभ्यास करतो. जेणेकरून परिणामकारक असा कायदा आपण तयार करू शकू. कायदा करण्याची आवश्यकता असेल तर राज्याची तशी मानसिकता आहे. षडयंत्राचा भाग म्हणून कोणत्याही महिलेची फसवणूक होऊ नये अशी राज्य सरकारची भूमिका आहे”.
श्रद्धा वालकर प्रकरणासंदर्भात ते म्हणाले, “श्रद्धा वालकर प्रकरण माणुसकीला काळिमा फासणारं आहे. श्रद्धा वालकरच्या वडिलांची भेट झाली. सगळा घटनाक्रम आहे तो समजून घेतला.
एखादा व्यक्ती इतका क्रूर कसा होऊ शकतो? प्रिय व्यक्तीची हत्या करून तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवायचे. त्याच फ्रीजमधून कोल्ड्रिंक काढून प्यायचं. अशा प्रकारची मानसिकता येते कुठून? हा देखील एक प्रश्न आहे. केस दिल्लीत घडल्याने आता दिल्ली पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे”.
ते पुढे म्हणाले, “तक्रार परत घेण्यासंदर्भात श्रद्धावर कोणाचा दबाव होता का? राजकीय किंवा कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीचा दबाव आढळून आलेला नाही. श्रद्धाने तक्रार मागे का घेतली याची चौकशी आपण करत आहोत. साध्या मनाने तिने तक्रार मागे घेतलेली नाही.
“तिने तक्रार देणं आणि ती तक्रार मागे घेणं यात एका महिन्याचा कालावधी गेला आहे. यादरम्यान पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली? पोलिसांनी कार्यवाही केली असती तर हे सगळं टाळता आलं असतं. इतके दिवस कारवाई का केली नाही याची चौकशी करत आहोत.
“एखाद्या महिलेची तक्रार आली तर तात्काळ कार्यवाही करायला हवी हे डीजींच्यामार्फत पोलिस स्थानकांना कळवण्यात आलं आहे. सदरहू महिला दबावात तर नाही याचीही माहिती घेतली आहे. राज्यभरात 40 मोर्चे निघाले”.