अकोले प्रतिनिधी-
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या टेक्निकल कॅम्पसमधील एम.बी.ए. आणि एम.सी.ए. या विभागातील प्रथम व व्दितीय वर्षातील विद्यार्थ्यांची नाशिक येथील सुला वाईन्स कंपनी व कै. वसंतराव कानेटकर उद्यान या औद्योगिक प्रकल्पांना विशेष अभ्यास भेटीचे आयोजन महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या वतीने आयोजन करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयातील ३७ विद्यार्थी व विद्यार्थीनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या अभ्यास भेटीत विद्यार्थ्यांना द्राक्षांपासून मद्य निर्मिती प्रक्रिया, त्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री, टँक्स, ड्रम्स इ. साहित्याविषयी सविस्तर माहिती, त्याची सहेतुक उपयुक्तता, द्राक्षांचे प्रकारनुसार वेगवेगळी वैशिष्ट्यपूर्ण मद्य निर्मिती, मद्य व्यवसायातील नवनवीन व्यावसायिक संधी, अर्थप्राप्ती या विषयीची संपूर्ण माहिती सुला वाईन्सचे प्रशासकीय अधिकारी अमृतपाल सिंग व श्रीमती कल्याणी जाधव यांनी दिली. यावेळी विद्यार्थ्यांना मागदर्शन करताना सुला वाईन्सचे प्रशासकीय अधिकारी अमृतपाल सिंग म्हणाले की, “आज २१ व्या शतकात रोजगार व स्वयंरोजगार याबाबत युवक अनभिज्ञ आहेत. अशा वेळी युवकांनी आपल्या आजूबाजूच्या भौगोलिक परिस्थितीचा सूक्ष्म अभ्यास करून विविध नाविन्यपूर्ण व्यवसाय वृद्धी करणे, त्यासाठी आपला संशोधकीय दृष्टीकोनात विकसित केला पाहिजे. बदलत्या काळानुसार व्यवसायातून नवनवीन सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यासाठीची सर्जनशीलता युवकांमध्ये यावी. त्यासाठी अशा अभ्यास भेटी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहेत. आज नाशिकमधील सुला व्हाइन हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प निःसंशयपणे देशातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित वाईनरींपैकी एक आहे. भारतातील मद्यनिर्मिती उद्योगात अर्थक्रांती घडवून आणण्यात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण ओळख मिळवण्यात यशस्वी झाला आहे.”
सुला वाईन प्रकल्पाच्या अभ्यास भेटी बरोबरच विद्यार्थ्यांनी वसंतराव कानेटकर उद्यान येथेही भेट दिली. येथे विद्यार्थ्यांना उद्यानातील विविध झाडांपासून जमा होणाऱ्या पालापाचोळा व शेण यांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या सेंद्रिय खत निर्मिती प्रक्रिया, त्याची उपयुक्तता व फायदे या बद्दलची संपूर्ण माहिती उद्यान प्रकल्प अधिकारी मा. श्री दिनेश धनगर यांनी दिली. यावेळी विद्यार्थ्यांना मागदर्शन करताना प्रकल्प अधिकारी मा. श्री. दिनेश धनगर म्हणाले की, “मनुष्य हा आज पुन्हा आयुर्वेदाकडे जाताना दिसत आहे. आयुर्वेदीक उपचारपद्धती वेळखाऊ असली तरी अल्प खर्चिक आणि शाश्वत आजारातून मुक्ती मिळवून देणारी आहे. तरुणांनी याकडे एक व्यवसाय म्हणून पहायला हवे.” याशिवाय या उद्यानात असलेल्या आयुर्वेदिक वृक्षांविषयी अत्यंत महत्वाची माहितीही त्यांनी दिली. या औद्योगिक अभ्यास भेटीत विद्यार्थ्यांनी उत्पादन, वित्त, पॅकिंग, मालसाठा, मनुष्यबळ आणि वितरण प्रकिया इ. विविध विभागांना भेटी देत स्वयंस्फूर्तीने माहिती संकलित केली.
या औद्योगिक भेटीचा विद्यार्थ्यांना भविष्यात विविध उद्योग व्यवसाय स्थापनेत निश्चित उपयोग होईल, असा विश्वास एम.बी.ए. महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत तांबे यांनी व्यक्त केला. या संपूर्ण औद्योगिक भेटीच्या उपक्रमाबद्दल अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी समाधान व्यक्त केले.यापुढेही असेच नाविन्यपूर्ण जास्तीत जास्त उपक्रम राबवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देत राहावे, असे त्यांनी सुचविले. या अभ्यासभेटीला एम.बी.ए. विभाग प्रमुख व नॅक समन्वयक प्रा. गोपाल बुब आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. प्रशांत उगले यांचे मार्गदर्शन लाभले. या औद्योगिक अभ्यास भेटीसाठी एम.सी.ए विभाग प्रमुख प्रा. अमोल नवले, प्रा. संकेत ढवळे, प्रा. महेश पावडे, प्रा. सुयोग गजे, प्रा. अमर खोंड, प्रा. सागर वाकचौरे यांचे विशेष सहकार्य लाभले.